Thu, Jun 04, 2020 23:03होमपेज › Marathwada › बीडमधून केवळ दोघांनाच मिळाली तीन वेळा खासदारकी

बीडमधून केवळ दोघांनाच मिळाली तीन वेळा खासदारकी

Published On: Apr 11 2019 2:06AM | Last Updated: Apr 10 2019 11:53PM

शिरीष शिंदे

बीड : लोकनेत्या स्व. केशरबाई क्षीरसागर व जयसिंगराव गायकवाड या दोघांनाच तीन वेळा लोकसभा निवडणुकीत अधिक मताधिक्क्याने यश मिळविता आले. मात्र यांच्या शिवाय इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास दुसर्‍यांदा लोकसभेसाठी निवडूून येता आले नाही. 

स्व. केशरबाई क्षीरसागर भारतीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर 1980 व 1984 साली लोकसभवर निवडून आल्या होत्या. तर  1991 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. 1996 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रजनी पाटील यांनी केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव केला. जयसिंगराव गायकवाड यांनी केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रमाणे तीन वेळा निवडून येण्याचा मान मिळविला आहे. गायकवाड हे भाजपच्या तिकिटावर 1998,1999 मध्ये तर 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर  लोकसभेत गेले. हैद्राबाद मुक्‍ती संग्रामनंतर बीड लोकसभा मतदार संघाची स्थापना 1951 साली झाली. त्यावेळी बीड जिल्ह्याचे पहिले खासदार रामचंद्र गोविंदराव परांजपे उर्फ  बाबासाहेब परांजपे पीपल्स डेमॉक्रॅटिक फ्रं टच्या तिकिटावर 1952 मध्ये निवडून आले होते. त्यानंतर 1952 ते 1980 या कालावधीत एकही उमेदवाराला सलग दोन वेळा विजय प्राप्‍त करता आलेला नाही. केवळ केशरबाई क्षीरसागर व जयसिंगराव गायकवाड हे दोनच उमेदवार तीन वेळा लोकसभा निवडणुकीत  विजयी झाले आहेत. 1957 मध्ये रखमाजी गावडे तर 1962 मध्ये द्वारकासदास मंत्री हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा 1967 मध्ये उमदेवारी देण्यात आली होती. मात्र सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कम्युनिष्ट पक्षाकडून तिकिट मिळवून मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्‍त केला. 1971 मध्ये काँग्रेसचे उमेदवार सयाजीराव पंडित निवडून आले होते. 1977 मध्ये आणिबाणी लागू झाल्यानंतर कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार गंगाधर बुरांडे यांनी खासदारकी मिळवली. त्यावेळी बुरांडे यांनी काँगे्रसचे उमेदवार लक्ष्मणराव देशमुख यांचा पराभव केला. 1980 मध्ये केशरबाई क्षीरसागर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत रघुनाथ मुंडे यांचा पराभव केला. पुन्हा क्षीरसागर यांनी 1984 मध्ये अपक्ष उमेदवार श्रीधर गिते यांचा पराभव केला.

1989 मध्ये जनता दलाचे बबनराव ढाकणे निवडून आले. पुढे 1991 मध्ये केशरबाई क्षीरसागर पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. त्यांचा हा तिसरा विजय होता. त्यांनी भाजपच्या सदाशिवराव मुंडे यांचा पराभव केला होता.  भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर रजनी पाटील यांनी 1996 मध्ये केशरबाई यांचा पराभव करत लोकसभेत पाऊल ठेवले. 1998 व 1999 मध्ये जयसिंगराव गायकवाड  भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश करत पुन्हा खासदारकीचे तिकीट  मिळविले आणि भाजपचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा पराभव करुन विजयी झाले.