Sun, Oct 20, 2019 07:33होमपेज › Marathwada › हिंगोली : तब्बल एक कोटींची रोकड जप्‍त

हिंगोली : तब्बल एक कोटींची रोकड जप्‍त

Published On: Apr 15 2019 7:11PM | Last Updated: Apr 15 2019 7:10PM
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) :  प्रतिनिधी 

मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्‍लक असताना प्रशासनाकडून पैशांसह इतर बाबींवर करडी नजर ठेवली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाटा येथे नेमण्यात आलेल्या एसएसटी पथकाने सोमवारी (दि.15) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास नांदेडकडून हिंगोलीकडे येणार्‍या कारची तपासणी केली.  या कारमध्ये एक कोटी रूपयांची रोकड आढळून आल्याने एसएसटी पथक कर्मचार्‍यांनी ही रक्‍कम सिलबंद करून कळमनुरी येथील कोषागार कार्यालयात जमा केली.

हिवरा फाटा येथे एसएसटी पथक नेमण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास नांदेडकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या एका कारची ( क्रमांक एमएच 38-8082) एसएसटी पथकाने तपासणी केली. यावेळी या कारमध्ये पोलिसांना दोन पेट्या आढळून आल्या. या दोन पेट्यांमध्ये एक कोटी रुपयांची रक्‍कम आढळल्याने पथकातील कर्मचार्‍यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांना घटनास्‍थळी पाचारण केले. त्यांनी पंचनामा करून रक्‍कम ताब्यात घेतली. ही रक्‍कम हिंगोली येथील सुंदरलाल सावजी बँकेची असल्याचे गाडीतील कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. जप्त करण्यात आलेली रक्‍कम कळमनुरी येथील कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली असून, चौकशीअंती यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले.