Mon, Sep 16, 2019 05:31



होमपेज › Marathwada › एकादशी: तुळजाभवानी देवीची श्री विठ्ठल रुपात पूजा

एकादशी: तुळजाभवानी देवीची श्री विठ्ठल रुपात पूजा

Published On: Jul 23 2018 5:13PM | Last Updated: Jul 23 2018 5:13PM



तुळजापूर : प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्ताने सोमवारी तुळजाभवानी देवीची श्री विठ्ठल रुपात विशेष पूजा मांडण्यात आली. श्री विठ्ठलाच्या रुपातील आई तुळजाभवानी देवीच्या नयनमनोहर सावळ्या रुपाचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. सोमवारी पहाटे मंदिरात चरणतीर्थ पूजा संपन्न झाली. त्यानंतर मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी पूजेची घाट झाल्यानंतर देवीच्या अभिषेक पूजा पार पडल्या. अभिषेक पूजेनंतर देवीची धुपारती करण्यात आली. त्यांनतर अंगारा काढण्यात आला.

सोमवारी आषाढी एकादशीची पर्वणी साधत तुळजाभवानीची श्री विठ्ठलाच्या रुपात विशेष पूजा मांडण्यात आली. भोपे पुजारी अतुल मलबा, सार्थक मलबा, प्रकाश मलबा यांनी ही विशेष पूजा मांडली. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, रुपेश कदम, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. या विशेष पूजेत देवीच्या भाळावर चंदनाचा मळवट भरून त्यावर विठ्ठलाचा वैष्णव गंध रेखला होता. मस्तकावर विठ्ठलाप्रमाणे सुवर्ण मुकुट घालण्यात आला होता. नाकात रत्नजडित नथ असून प्राचीन पारंपारिक दागदागिन्यांनी देवीला मढवण्यात आले होते. तसेच एकादशीनिमित्त तुळशीच्या पानांचा हार घातला होता. सोनेरी रंगाचा जरीकाठाचा शालू देवीला नेसवण्यात आला होता. चुणीदार शालू नेसवून देवीला नेसवून श्री विठ्ठलाच्या रुपात दर्शवण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या रुपातील देवीचे अलौकिक रुप खुलून दिसत होते.

आषाढी एकादशीनिमित्त मांडलेल्या नयनमनोहर विशेष पूजेचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणारे भाविक देवीदर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरात भाविकांची मोठी गर्दी वाढल्याची दिसून येत आहे.