Mon, Jun 01, 2020 19:08
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › उस्मानाबादमध्ये ओमराजेंचा मोठा विजय

उस्मानाबादमध्ये ओमराजेंचा मोठा विजय

Published On: May 24 2019 2:27AM | Last Updated: May 24 2019 1:11AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

सर्वच विधानसभा मतदारसंघांतून आघाडी घेत शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित केले. राणा जगजितसिंह पाटील यांना 1 लाख 26 हजार मतांनी पराभूत करून त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने 18 एप्रिलला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास सुरू झाली. 30 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी झाली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मतमोजणीची अंतिम आकडेवारी समोर आली. यानुसार  राजे निंबाळकरांना 5 लाख 90 हजार 890, तर राणा जगजितसिंहांना 4 लाख 64 हजार 21 मते मिळाली. वंचित आघाडीचे अर्जुन सलगर यांनी 97 हजार 749 मते घेतली. राजे निंबाळकरांनी 1 लाख 26 हजार 869 मतांची आघाडी घेत विजय मिळविला. सकाळी आठला टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर मतदान यंत्रांतील मतमोजणी सुरू झाली. पहिल्याच फेरीत राजे निंबाळकर यांनी 7 हजार मतांची आघाडी घेतली. ती अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. दुपारी 12 च्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीसमोर गर्दी केली. तोपर्यंत देशातही पुन्हा ‘एनडीए’ला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. ओमराजे समर्थक तसेच्या भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाली. शिवसेनेच्या व मोदींच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पाचव्या फेरीला राजे निंबाळकरांची आघाडी 24 हजारांवर गेली, तर दहाव्या फेरीला 56 हजारांवर आघाडी मिळाली.

औशातून बंपर लीड

शिवसेना उमेदवार राजे निंबाळकरांना औसा विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाल्याचे प्रत्येक फेरीतून स्पष्ट होत होते. त्यापाठोपाठ उमरगा, तुळजापूर, परंडा या मतदारसंघांचा समावेश होता. बार्शी, उस्मानाबाद मतदारसंघांतून मात्र ओमराजेंना तुलनेने कमी मताधिक्य मिळाले. 

भाऊबंदकीतून ईर्षा

ओमराजेंचे वडील पवनराजे व आ. राणा जगतसिंहांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील हे सख्खे चुलतबंधू. 2004 मध्ये डॉ. पाटील यांच्याविरोधात पवनराजेंनी निवडणूक लढविली. त्यात डॉ. पाटील 450 मतांनी विजयी झाले. पुढे 2009 मध्ये राणाजगजितसिंह ओमराजेंकडून पराभूत झाले. 2014 मध्ये राणाजगजितसिंहांनी ओमराजेंचा पराभव केला. आता लोकसभेच्या रणातही भाऊबंदकीचा सामना रंगू लागला आहे. त्यात पहिली मात देण्यात ओमराजे यशस्वी झाले आहेत.