Thu, Jun 04, 2020 13:06होमपेज › Marathwada › नक्षलवादी हल्ला : शहीद जवान संतोष चव्हाण अनंतात विलीन

नक्षलवादी हल्ला : शहीद जवान संतोष चव्हाण अनंतात विलीन

Published On: May 03 2019 12:42PM | Last Updated: May 03 2019 12:32PM
हिंगोली : प्रतिनिधी

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या ब्राम्हणवाडा येथील वीर जवान संतोष चव्हाण यांना शासकीय इतमामात आज (दि.३) अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद संतोष यांच्या अंत्यसंस्कारावेळी 'संतोष चव्हाण अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतोष चव्हाण यांचा मुलगा तेजसने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास संतोष चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नक्षलवाद्यांच्या हल्यात औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील जवान संतोष चव्हाण यांना वीर मरण आले. काल, गुरूवारी रात्री उशीरा वीर जवान संतोष चव्हाण यांचे पार्थिव हिंगोली येथे दाखल झाले. आज औंढा नागनाथ येथे वीर जवान संतोष यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. सकाळी ८च्या सुमारास त्यांचे पार्थिव ब्राम्हणवाडा येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले. अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले. 

मोठ्या ट्रकमध्ये संतोष चव्हाण यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. संपूर्ण ट्रक फुलाने सजविण्यात आला होता. अंत्यविधीसाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फोर्स दाखल झाला होता. गावातून ज्या रस्त्याने पार्थिव नेले जाणार होते. त्या रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या. अंत्यविधीसाठी एसआरपीएफ व जिल्हा पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संतोष चव्हाण यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरासमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होता.