Fri, May 29, 2020 01:51होमपेज › Marathwada › बहिष्कारानंतर नारायणवाडीच्या नागरिकांना आमदार सुरेश धस यांचे आश्वासन

मतदानावरील बहिष्कारानंतर नारायणवाडीकरांना रस्त्याच्या कामाबाबत दिले आश्वासन

Published On: Apr 25 2019 9:31AM | Last Updated: Apr 25 2019 9:24AM
शिरूर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी गावात आल्याशिवाय मतदान करणार नाहीत, या भूमिकेवर ठाम राहून नारायणवाडीकरांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारानंतर बुधवारी आमदार सुरेश धस यांनी गावाला भेट देऊन निमगाव (मायांबा)ते नारायणवाडी या रस्त्याचे काम १५ जुलैपूर्वी पूर्ण करणार, असे आश्वासन देऊन नारायणवाडीकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

शिरुर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नारायणवाडी या गावाला स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही व शिरूर कासार तालुक्याच्या नवनिर्मिती दीड तपानंतर ही विकासाचा मोठा अभाव आहे. विशेष म्हणजे गावाला बाहेर पडण्यासाठी असलेला एकमेव रस्ता म्हणजे निमगाव मायांबा ते नारायणवाडी हा पांदण रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दुरावस्था काही केल्याने हटत नसल्याने नारायणवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मतदानाच्या दिवशी तहसीलदार प्रिया सुळे, नायब तहसीलदार किशोर सानप, गटविकास अधिकारी बागडे आदी अधिकाऱयांनी गावाला भेट देऊन गावाची मतदान करण्यासंबंधी विनवणी केली होती. मात्र या विनवणीला गावकऱ्यांनी दिवसभर भीक घातली नाही. या बहिष्कारामुळे राजकीय वर्तुळातही चांगली खळबळ उडाली आहे. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी बुधवारी नारायणवाडी  गावाला भेट देऊन गावाच्या यथोचित समस्या ऐकून घेतल्या. या समस्यांचे कथन करतेवेळी गावकरी जोपर्यंत जिल्हाधिकारी आमच्या गावाला भेट देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहोत.

असे सांगून जर तुम्हाला आमच्याबद्दल काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना गावांमध्ये घेऊन या. त्यानंतर आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने ऐकून घेऊ असे आमदार सुरेश धस यांना गावकऱ्यांनी एका सुरात सांगितले होते. याला उत्तर देताना आमदार सुरेश धस म्हणाले, आता रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवण्याची गरज नाही. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता निमगाव मायंबा ते नारायणवाडी या रस्त्याच्या कामासाठी मी तात्काळ प्रयत्न करत असून, हा रस्ता १५ जुलैपर्यंत हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे अभिवचन देऊनगावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्याचबरोबर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मी तात्काळ सीईओ यांना बोलून दोन शिक्षकांची व्यवस्थाही करतो. त्याचबरोबर सौभाग्य योजने खाली गावकऱ्यांनी अर्ज करून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी. ते गावकऱयांच्या हिताचे ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार, पंचायत समिती सदस्य रवींद्र जरांगे, माळेगाव चकलाचे माजी सरपंच धनसिंग दहीफळे, निमगाव मायंबा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब इंगोले, उद्धव बापू खेडकर, बंडू घुंगरड, नारायण घुंगरड, समाधान कापरे उपस्थित होते. नारायणवाडीकरांच्या मनधरणीसाठी आमदार सुरेश धस यांचे हे वक्तव्य जरी समाधानकारक वाटले असले तरी प्रत्यक्षात या अभिवचनाला आमदार धस किती जागरूक राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

गावकरी घेणार पुन्हा बैठक

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काही राजकीय पुढार्‍यांनीही मतदान करण्यासाठी गावकऱ्यांना विनंती केली होती. मात्र या विनंतीला गावकऱ्यांनी कसलीच भिक न घालता एकजुटीने हा बहिष्कार सफल केला. गावकऱ्यांच्या या एकजुटीपुढे आमदार सुरेश धस यांनी नमते घेत १५ जुलैपूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी, गावकऱ्यांनी गेल्या अठरा वर्षांपासून आलेल्या कडवट अनुभव लक्षात घेता आ. सुरेश धस यांना संधी द्यायची की नाही यासंबंधी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्‍याचे गावकऱ्यांमध्ये बोलले जात होते.

मातोरीच्या सभेवेळी झाली होती चर्चा.

पालकमंत्री पंकजा मुंडे शिरूर कासार तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी जाहीर सभा घेतली होती.या सभेपूर्वीच १४ जानेवारी रोजी नारायणवाडीकरांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असे निवेदन दिले होते. याची माहिती आमदार सुरेश धस यांना मिळाल्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी आपण प्रयत्न करू असे सांगण्यासाठी नारायणवाडीच्या ग्रामस्थांना मातोरी येथे बोलावले होते व मी हेच अभिवचन गावामध्ये येऊन सर्वांसमोर सांगतो असेही सांगितले होते. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत मला तुमच्यापर्यंत येता आले नाही.म्हणून बहिष्कार टाकण्याची दुर्देवी वेळ आल्याचेही आमदार धस यांनी यावेळी कबूल केले.