Thu, Oct 17, 2019 05:28होमपेज › Marathwada › 'जाणाऱ्यांना खुशाल जाऊ द्या, आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ'

'आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ'

Published On: Aug 26 2019 3:19PM | Last Updated: Aug 26 2019 8:16PM

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलउस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन  

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रांगच लावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला भगदाड पडल्यात जमा झाले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले. 

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा उस्मानाबादेत पोहोचली आहे. ते म्हणाले,  'अ' गेला तर 'ब' आहे, 'ब' गेला तर 'क' आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले, तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जाणारे खुशाल जाऊ देत. येत्या निवडणुकीत कुणी फंदफितुरी केली, तर त्याचा पाडाव करून निवडणुका जिंकायच्या आहेत.  

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवस्वराज्य आणायचं असे महाराष्ट्रातील तरुण, महिला, शेतकऱ्यांनी ठरवले आहे. म्हणूनच राज्यात निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत. हा दोन यात्रांमधील फरक लक्षात घ्या. 

एकीकडे राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा सुरू असताना भगदाड पडण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसला आज आणखी एक धक्का बसला. अनेक दिग्गजांनी भाजप, सेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लागला आहे. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल यांच्यानंतर सोपल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मोठे गडाला भगदाड पडले आहे.