Fri, Jun 05, 2020 20:29होमपेज › Marathwada › उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक 

उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक 

Published On: Feb 18 2019 11:52PM | Last Updated: Feb 18 2019 10:34PM
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे आल्यानंतर भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या बीड लोकसभा मतदारसंघावर 2004 चा अपवाद वगळला तर कायम भाजपचे वर्चस्व आहे. मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी देशातले सारे विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. पावणेसात लाखांच्या फरकाने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. दरम्यान, मुंडे यांच्या नंतर त्यांचा बालेकिल्ला अबाधित राहतो की ढासळतो? असा प्रश्‍न निर्माण झाला होता, परंतु पंकजा आणि प्रीतम मुंडे या भगिनींनी विकास आणि नीतिमत्तेच्या राजकारणाची सांगड घालून बालेकिल्ला आणखी मजबूत केला. बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांची भाजपात घरवापसी करून पंकजा मुंडे यांनी बालेकिल्ल्याच्या भोवती अभेद्य अशी तटबंदी उभी केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 च्या निवडणुकीत मुंडेंच्या बालेकिल्ल्याची ही तटबंदी भेदता येणे शक्य नाही. 

1952 ते 1996 पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील (माकप), गंगाधरअप्पा बुरांडे, बबनराव ढाकणे (जनता दल) हे तीन अपवाद वगळले तर बीड लोकसभा मतदारसंघावर कायम काँग्रेसचे वर्चस्व होते. अकराव्या लोकसभा निवडणुकीत (1996) भाजपच्या तिकिटावर रजनी पाटील निवडून आल्या. 1996 नंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीचा (जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी) अपवाद वगळला तर कायम भाजपचे वर्चस्व आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी 2009 साली पहिली लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत 1 लाख 40 हजार 952 एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आडसकर यांचा पराभव केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश धस यांचा त्यांनी एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. 

त्यानंतर मुंडे यांचे निधन झाल्याने झालेली पोटनिवडणूक प्रीतम यांनी जिंकली.केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मुंडे भगिनींनी सत्तेचा पुरेपूर वापर करत मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. रेल्वेसाठी 2856 कोटी रुपयांचा निधी मिळवला. जिल्ह्यात 11 नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून झालेे. यातील अर्ध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून काही मार्ग तर पूर्णत्वास आले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शेकडो कोटी रुपयांचा ग्रामीण रस्त्यांसाठी दिला. जलयुक्तशिवार योजना यशस्वी झाली. पंकजा मुंडे यांनी विकास योजना आणि निधी खेचून आणत बीड जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे. एकीकडे विकासकामे करत असतानाच सकारात्मक राजकारण करून सुरेश धस, रमेश आडसकर या राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना भाजपत आणले. माजी मंत्री बदामराव पंडित, मोहन जगताप हे नेते भाजपत नसले तरी पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटबाजीने खिळखिळा झाला आहे. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके या तीन नेत्यांपुरताच पक्ष लिमिटेड झाला आहे. लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असली तरी राष्ट्रवादीने उमेदवार कोण हे जाहीर केलेले नाही. प्रीतम मुंडे यांना टक्कर देईल असा उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक होत आहे.   गत काही काळात राष्ट्रवादीपासून दुरावलेले आ. जयदत्त क्षीरसागर यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली होती. त्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच आ. क्षीरसागरांना तयारीला लागण्याचे संकेत दिले होते, परंतु राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा चांगलाच अनुभव असलेल्या आ. क्षीरसागरांनी निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.