Fri, Jun 05, 2020 20:09होमपेज › Marathwada › होमपीचवर मुंडे भावंडांचे एकमेकांना गुगली, यॉर्कर

होमपीचवर मुंडे भावंडांचे एकमेकांना गुगली, यॉर्कर

Published On: Feb 12 2019 1:07AM | Last Updated: Feb 12 2019 1:07AM
परळी : रवींद्र जोशी 

राज्यातील राजकीय मैदानावर अग्रेसर राहत आपापल्या  टीममध्ये अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेल्या आणि नेहमीच वलयांकित राहणार्‍या मुंडे भावंडांच्या एकमेकांनी परळी या होमपीचवर शाब्दीक गुगली, यॉर्कर आणि प्लेड -प्लेडचे चिमटे काढत प्रगल्भ जुगलबंदीचा अनुभव परळीकरांना दिला. व्यासपीठाची आब ओळखून आणि समारंभाचा साहित्यिक ढंग पारखून साहित्यिक मूल्य असलेले भाषण करीत दोघांनीही दाद मिळवली. 

परळी नगरीचे भूषण व मराठी साहित्यात ज्यांचं आदरानं नाव घेतले जाते असे आबासाहेब वाघमारे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा परळीत रंगतदार झाला. यावेळी अनेक दिवसांनंतर प्रथमच पालकमंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. आबासाहेब वाघमारे गुरुजींवरची श्रद्धा आणि आयोजकांचे कौशल्य यामुळे गौरव सोहळा प्रत्येकाची समतुल्य प्रतिष्ठा जपत पार पडला. यावेळी मुंडे भावंडांनी एकमेकांचा आदराने व प्रोटोकॉल प्रमाणे नामोल्लेख केला. त्याचप्रमाणे दोघांनी केलेल्या व्यक्तीगत सत्कारावेळी उभे राहून सार्वजनिक संकेत पालनाचा वस्तूपाठही आपापल्या समर्थकांना घालून दिला. मनोगतांमध्ये प्रत्यक्षात स्पष्ट राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा खिलाडूवृत्तीने एकमेकांच्या टिप्पणीवर अप्रत्यक्ष प्रगल्भ  टिपण्या करत वक्तृत्वातील आपला वाकबगारपणा दाखवून दिला. मी वेळेवर येणारी विद्यार्थिनी असल्याचा उल्लेख पंकजा मुंडेंनी करत काहीशा उशीराने येणार्‍या धनंजय मुंडे यांना चिमटा काढला. पालकमंत्र्यांनी टाकलेला हा यॉर्कर धनंजय मुंडे यांनीही तेवढ्याच चपखलपणे टोलवला. आपण, येण्यास उशीर झाला असे सांगत आपण वेळेवर नाही, पण लोकांच्या कामात वेळेवर येणारा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. दरम्यान आयोजन समितीच्या वतीने राजकीय क्षितिजावरील दोन ध्रुव एकत्र आले असल्याचे सांगण्यात येत होते. हे समारंभाच्या पार्श्वभूमीवर एका अर्थाने खरे असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अढळपद निर्माण केलेले हे ध्रुवतारे असल्याचे राजकीय सत्य कोणालाही नाकारता येणार नाही, हे मात्र वास्तव आहे.