Sat, Jun 06, 2020 22:01होमपेज › Marathwada › मुक्ती संग्राम दिनविशेष : हैदराबाद मुक्ती संग्रामामुळेच देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व

मुक्ती संग्राम दिनविशेष : हैदराबाद मुक्ती संग्रामामुळेच देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व

Published On: Sep 17 2018 1:23AM | Last Updated: Sep 16 2018 10:38PMअंबाजोगाई : रवी मठपती 

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या झुंजार नेतृत्वाखाली  लढल्या गेलेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामामुळेच देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले.म्हणूनच हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यामुळे अंबाजोगाई शहराची ओळख देशभर आहे. 17 सप्टेंबर रोजी एक्काहत्तरावा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, स्वातंत्र्य सेनानी, मराठी चळवळकर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव  व्यंकटेश  खेडगीकर असे आहे. स्वामीजींच्या विचारांची व कार्याची धग आजही सर्वांच्या मनामनात टिकून आहे. त्यांचा त्याग व देशाबद्दलची अस्मिता अफाट होती. ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी त्यांची कार्यपद्धती होती. 

रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे 3 ऑक्टोबर  1903 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलमध्ये ते कार्यरत होते. सन 1930 मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली. त्यांचे मराठीवरचे प्रेम अंबाजोगाई येथील  योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिसून येते. 

स्वातंत्र्यपूर्व भारतात सुमारे 600 संस्थाने होती. त्यापैकीच हैदराबाद संस्थान हे होते. संस्थांनात तेलंगणाचे 8 जिल्हे मराठवाड्याचे 5 जिल्हे व कर्नाटकाचे 3 जिल्हे अशा 16 जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. या संस्थानावर इ. स. 1724  ते 1948 पर्यंत तब्बल 225 वर्षे धर्मांध जुलमी निजामी राजवट होती. सात पिढ्या निजामी राजवटीने जनतेवर अत्याचार केले. विविध प्रकारे शोषण केले. अज्ञान व अत्याचाराने गुदमरलेल्या  जनतेच्या जीवनात प्रकाशाची वाट निर्माण करण्याचे महनीय कार्य प्रकाशयात्री क्रांतीसूर्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे आदींनी तुळजापूर जवळील हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत 1929   ते 1935 या काळात विद्यार्थ्यांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार केले. 1935 मध्ये अंबाजोगाईच्या श्री योगेश्‍वरी नूतन विद्यालयात राष्ट्रीय शाळेत राष्ट्रभक्तीचे संस्कार करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हैदराबाद मुक्तीसंग्रामात कार्य करण्यासाठी प्रेरित केले. वंदे मातरम् चळवळ, खादीचा प्रसार,  कार्यकर्त्यांचे संघटन व संघटित कार्य यासाठी योगेश्‍वरी नूतन विद्यालयाचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे समर्पित कार्य विविध घटनाप्रसंगी मोलाचे ठरले आहे. यात स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, नारायणराव जोशी, एकनाथराव गुरुजी, बेथुजी गुरुजी, अ‍ॅड. आर. डी. देशपांडे, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे, श्रीनिवास खोत, दिगंबर विर्धे, धोंडू पवार आदींचा उल्लेख करावा लागेल.

हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचे योगदान सर्वाधिक मोलाचे ठरले. प्रत्येक घरातील व्यक्ती सामान्य जनता या लढ्यात रस्त्यावर उतरली होती. 24 ऑक्टोबर  1938 रोजी सुरू झालेल्या पहिल्या सत्याग्रहानंतर दुसरा सत्याग्रह  27 ऑक्टोबर रोजी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली झाला. स्वामीजी व अन्य चार सहकार्‍यांना यासाठी कारावास पत्करावा लागला होता. 16  ते 30 मार्च 1944 दरम्यान स्वामीजींनी हैदराबादेत राजकीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून अनेक कार्यकर्ते घडविले. 15 ऑगस्ट 1947  रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी हैदराबाद संस्थानातील जनता निजामी राजवटीत अडकलेली होती. यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अखेरच्या पर्वाची तीव्रता वाढत गेली. वाढत्या निजामी अत्याचारांचा प्रतिकार केला गेला. शेकडो कार्यकर्ते शहीद झाले. 13  ते 17 सप्टेंबर 1948  या काळात  देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संस्थानात पोलिस कारवाई केली गेली. निजाम शरण आला आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाची सांगता झाली. स्वामीजींच्या कार्यामुळेच अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास,  नांदेड येथील विद्यापीठास  स्वामीजींचे नाव देण्यात आले आहे. 

स्वामीजींच्या कार्याचा व विचार प्रणालीचा वारसा येथील योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे अविरत चालू आहे. विद्यार्थ्यांना, कर्मचार्‍यांना तसेच मराठवाड्यातील जनतेला स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबद्दल अभिमान आहे, तसेच आदरयुक्त भीती आहे.