Thu, Jun 04, 2020 23:38होमपेज › Marathwada › गावगाड्याच्या कलेतूनच साकारली आधुनिक गौरी

गावगाड्याच्या कलेतूनच साकारली आधुनिक गौरी

Published On: Sep 15 2018 1:47AM | Last Updated: Sep 14 2018 9:45PMलातूर : शहाजी पवार

कधीकाळी बलुतेदारांचा मान असलेले व अवघ्या पानसुपारीवर समाधानाने पुरवण्यात येणारे गौरीचे मुखवटे आता इतिहासजमा झाले असून गावगाड्याचे हे वैभव असलेली ही कला आता आधुनिक रूप लेवून उत्पन्नाचे नवे साधन झाली आहे.

गौरीच्या मुखवट्यांचा व त्यांच्या प्रतिष्ठापनेचा प्रवास मोठा रंजक आहे. पूर्वी गावगाड्यात बारा बलुतेदारांना मानाचे स्थान होते. कुंभार गौरी गणपतीचे मुखवटे गावकर्‍यांना पुरवत असत. या बदल्यात कारभार्‍यांकरवी त्यांना मानाची सुपारी, खोबर वाटी व गुळाचा खडा मिळत असे. वर्षाकाठी मिळणार्‍या धान्यरुपी बलुत्यात बलुतेदारांचा प्रपंच भागायचा म्हणून अगदी पान-सुपारीवर गौरी-गणपती देण्यात त्यांना मनापासून समाधान वाटायचे.

गाईच्या शेणाचा गोल उंडा करून त्याला आकार देऊन त्यातून गौरीचा मुखवटा साकारला जाई. मजबुतीसाठी त्याला उन्हात चांगले वाळवले जात असे. पुढे भाजलेल्या मडक्यावर हळदी- कुंकूवाने नाकतोंड चितारलेले मुखवटे आले. या मुखवट्याच्या निर्मितीमागे सौंदर्यापेक्षा भक्तिभाव अधिक होता. त्यामुळे ते फारसे आखीव-रेखीव नसले तरी त्याची मनोभावे प्रतिष्ठापना होत असे. कालांतराने मुखवट्यातला हा ओबडधोबडपणा कलाकारांना जाणवला व सुरेख मूर्ती साकारण्याकडे बलुतेदारांनी लक्ष पुरवले. कुंभाराने मडकी बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या चिखलातून स्त्रीचा चेहरा साकारला. त्याला आव्यात भाजले जाई व गडद-पिवळ्या रंगाने तो रंगवला जाई. त्यावर नाक डोळे काढले जात असत. हीच आजच्या कॉर्पोरेट लूक असलेल्या गौरी मुखवट्याची पहिली प्रतिकृती होती.

माणसाचा कल कालौघात कलात्मकतेकडे अधिक गेला. त्यामुळे शाडूपासून आखीव-रेखीव मुखवटे साकारले जाऊ लागले. चेहरा, डोळे, नाक, केशरचना अधिक देखणी झाली. वेगळ्या रंगाचा वापर होऊ लागला. दरम्यान, विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने बलुतेदारीला घरघर लागली. बलुतेदारांच्या या कलेचा धागा पकडून अनेक मूर्तीकार तयार झाले. त्यांच्या मुखवट्याला व्यवसायाचे अधिष्ठान मिळाले. 1964 नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे आले व गौरीला आधुनिक कॉर्पोरेट लूक मिळाला.

गौरी उभारणी काल व आज

पूर्वी गौरी उभारण्यासाठी पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बांबुचा वापर केला जाई. त्यासाठी बांबू जमिनीत ठोकत असत.  त्यावर साड्या गुंडाळ्या जात व अग्रभागी मुखवटा बसवला जात असे. हे करण्यासाठी किमान पाच तास लागत असत. त्यानंतर मडक्यांची उतरंड करून त्यावर मुखवटे बसवले जाऊ लागले. प्रतिष्ठांच्या घरी भांड्याच्या उतरंडीचाही वापर होऊ लागला. उतरंडीला मांजराचा अथवा कोणाचाही धक्का लागला तर गौरी कोसळण्याची भीती होती, त्यामुळे अख्खा परिवार रात्रभर जागत असे. पुढे लोखंडी पट्ट्यांपासून तयार केलेल्या कोथळ्या आल्या. त्याची सुधारित आवृत्ती म्हणून मानवी शरीराच्या आकारातील पत्र्याचे डबे तयार झाले. आज तर अखंड सजलेली देखणी रेडिमेट गौरी ही अनेकांच्या मखरात दिसत आहे.