Sun, Jun 07, 2020 14:59होमपेज › Marathwada › अल्पवयीन युवकाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या कबुलीसाठी स्वच्छतागृहात डांबले

अल्पवयीन युवकाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या कबुलीसाठी स्वच्छतागृहात डांबले

Published On: Jun 22 2019 6:33PM | Last Updated: Jun 22 2019 6:33PM
सेनगाव : प्रतिनिधी

प्रेमासाठी कोण काय करेल याचा काही बेत नाही. प्रेमाची कबुली देण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने चक्क एका अल्पवयीन मुलीस तब्बल ३ तास स्वच्छतागृहात डांबून ठेवण्याचा प्रकार घडला आहे. सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे काल, शुक्रवारी (दि.२१) रोजी ही घटना घडली. या अल्पवयीने मुलीने आरडा ओरडा केल्यानंतर शेजारील नातेवाईकांनी तिची स्वच्छतागृहातून सुटका केली. या प्रकरणी आज, शनिवारी सेनगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. गावातील एका अल्पवयीन मुलाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. मात्र पिडीत मुलगीचे या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद नव्हता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या मुलीकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठी संबंधित मुलाने तिला अनेक वेळा विचारणा केली. परंतु मुलीने दाद दिली नाही. 

दरम्यान काल, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी शाळेत दाखला प्रमाणपत्र आणण्यासाठी निघाली होती. याचवेळी संबंधित मुलाने त्याच्या मित्राला सोबत घेत तिचा पाठलाग करत शेजारीच असलेल्या एका बंद घराच्या स्वच्छतागृहात पिडीत मुलीस स्वच्छतागृहात डांबून ठेवले. त्यानंतर माझ्या प्रेमाची कबुली दे असा तगादा लावला. तर तु ओरडल्यास तुझ्या भावाला जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली. जवळपास तीन तास स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याने आपली सुटका करून घेण्यासाठी अखेर मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिची सुटका केली.

यानंतर या प्रेमविराने आपल्या मित्रासह धुम ठोकली. सदरील अल्पवयीन मुलीने घटनेबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी सेनगाव पोलिस ठाणे संबंधित मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सेनगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपधिक्षक ए.जी. खान, पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर करीत आहेत.