Sun, May 31, 2020 03:00होमपेज › Marathwada › अर्जुन खोतकरांना उभे करण्यासाठी शिवसैनिक झाले आक्रमक

खोतकरांना उभे करण्यासाठी शिवसैनिक आक्रमक

Published On: Mar 12 2019 4:28PM | Last Updated: Mar 12 2019 4:19PM
जालना : प्रतिनिधी

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुक लढवावी यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी आक्रमक होत खोतकरांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या 'खोतकर अंगार है, बाकी सब भंगार है' च्या घोषणांमुळे परिसरातील वातावरण दुमदुमुन गेले. या दरम्यान खोतकर यांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्याना दोन दिवसांत मुंबईत उमेदवारीबाबत निर्णय होईल असे सांगत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या शहरातील भाग्यनगरात असलेल्या 'दर्शना' या निवासस्थानी मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यात भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शिवसैनिकांची संख्या अधिक होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी राज्यमंत्री खोतकर यांना  लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले. लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली असून भाजपाच्या या जागेवर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर हे हक्क सांगत आहेत. हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व ठाकरे यांच्यात मध्यंतरी चर्चा झाली. येत्या दोन दिवसात हा वाद सोडविण्यात येणार आहे. 

रविवारी झालेल्या लोंखडी पुलाच्या कार्यक्रमात दानवे व खोतकर हे एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांच्यात मनोमीलन झाल्याचे संकेत कार्यकर्त्याना मिळाले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी ही दानवे व खोतकर यांना राम-लक्ष्मणची उपमा दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी मंगळवारी थेट खोतकर यांच्या निवासस्थानी धाव घेत खोतकर यांना साकडे घातले. 

यावेळी जालना तालुकाध्यक्ष संतोष मोहीते, भोकरदन तालुकाध्यक्ष कैलास पुंगळे, मनिष श्रीवास्तव, नवनाथ दौड, सुरेश तळेकर, बाळासाहेब पाचरणे, नगरसेवक विजय पवार, ब्रम्हा वाघ यांच्यासह जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.