Sun, Jun 07, 2020 07:27होमपेज › Marathwada › झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:12PMसेलू : प्रतिनिधी

तालुक्यातील पारडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  रक्षाबंधनाचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून पर्यावरणाविषयी स्नेह व्यक्‍त करीत अनोखा संदेश दिला.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राम मैफळ तर प्रमुख पाहुणे म्हणून लाडनांद्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नानासाहेब पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राखी निर्मिती स्पर्धेमधील सर्वोत्तम राखी निवडण्यात आली. यामध्ये शिवानी लंघे या विद्यार्थिनीची सर्वोत्तम राखी निर्माती म्हणून निवड करण्यात आली. रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. यावेळी मुलींनी राख्या बनविल्या त्या सर्व राख्या वृक्षांसाठी होत्या. आज वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते त्या प्रमाणात वृक्षांची लागवड होत नाही.

त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो. वाढते प्रदूषण आदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यावेळी मुलांनी शालेय परिसरातील सर्व वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन करायचे  ठरवले.  शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना मुलींनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी मुख्याध्यापक राम मैफळ यांनी भारतीय संस्कृतीतील रक्षाबंधन या कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नानासाहेब पवार यांनी सुद्धा मुलांना रक्षाबंधन व तुम्ही वृक्षांना राख्या बांधून दिलेला संदेश किती अमूल्य आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज माने यांनी केले. आभार प्रदर्शन संजय काकडे यांनी केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.