Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Marathwada › मराठवाडा : पाणी भरताना विहीरीत पडून मुलगी जखमी

पाणी भरताना विहीरीत पडून मुलगी जखमी

Published On: May 11 2019 4:23PM | Last Updated: May 11 2019 4:00PM
सेनगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भानखेडा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. भानखेडा येथील गावालगत असलेल्या शेतात शनिवारी (दि.११) रोजी सकाळी ९ च्या सुमारास गावातील सोळा वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेली असता तिचा पाय घसरल्याने तब्बल ६०  फुट खोल असलेल्या विहीरीत ती पडली. यामुळे ती जखमी झाली. 

सेनगाव तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावामध्ये पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. भानखेडा येथे सुद्धा पाणी टंचाई असल्याने गावालगत असलेल्या शेतातील विहीरीतून ग्रामस्थ पाणी भरत आहेत. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास गावातील शितल इंगळे ही विहीरीवर पाणी भरत असतांना तिचा अचानक पाय घसरून तोल गेल्याने ती ६० फुट खोल विहीरीत पडली. विहीरीत ४ ते ५  फुट पाणी असल्याने तिला गंभीर दुखापत झाली नाही. 

शितलने आरडाओरड केल्यानंतर शेजारी शेतात काम करीत असलेल्या अविनाश कोरडे या युवकाने विहीरीत उतरून शितलला बाहेर काढले. या घटनेत शितल किरकोळ जखमी झाल्याने तिला सेनगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शितलची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.