Sun, Jun 07, 2020 07:30होमपेज › Marathwada › मराठा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही

मराठा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:46AMपाथरी : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे., या मागणीसाठी अनेक दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात आहे, पण शासन आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे.यामुळे पाथरी तालुक्यातील सारोळा बु. येथील मराठा बांधवांनी दि. 2 ऑगस्टपासून मराठा विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवले आहे.

सारोळा बु. येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षण विधेयकासह इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू केले आहे. समाजातील काही तरुणांनी यासाठी बलिदानही दिले आहे, परंतु निर्ढावलेले शासन ठोस पावले उचलण्यास तयार नाही.

बहुतांशी शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज शेतीच्या दुरवस्थेमुळे व शासनाच्या कुचकामी धोरणामुळे नेस्तनाबूत झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने तरी तो उठून उभा राहील, यासाठी शैक्षणिक वातावरणात रमत आहे, परंतु इतके शिकूनही त्याचे शिक्षण केवळ आरक्षण नसल्याने वाया जात आहे. त्यामुळे आरक्षण नाही तर शिक्षणाचा काही फायदा नाही अशी समाजाची मानसिकता झाली असून निर्लज्ज शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून सारोळा बु. येथील ग्रामस्थांनी दि. 2 ऑगस्टपासून मराठा समाजाने आरक्षणाचा काही ठोस निर्णय लागेपर्यंत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.या निवेदनाच्या प्रती सर्व संबंधिताना पाठविण्यात आल्या आहेत.

कडकडीत बंद पाळून जेलभरो आंदोलन

ताडकळस : प्रतिनिधी

येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण तत्काळ देण्यात यावे व विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी ताडकळस येथील सर्व व्यापारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. 
ताडकळस येथील सर्व मराठा समाजाच्या वतीने गावातील रस्त्यांवरून रॅली काढून जेलभरो आंदोलन केले. ताडकळस येथील बसस्थानकावरून सर्व मराठा युवकांनी स्वतःहून पोलिस व्हॅनमध्ये बसून पोलिस ठाण्यात जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात ताडकळस येथील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी पोलिस ठाण्याचे सपोनि गजानन पाटेकर व पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त होता.

पालम : कार्यकर्त्यांना अटक, सुटका

पालम : प्रतिनिधी

मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, आंदोलनात शहीद झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, कार्यकत्यार्र्ंवर दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथे दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11  वाजता मुख्य चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. 

शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. अनेक वेळा शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही शासनाने अद्याप मराठा समाजास आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे मराठा समाजात शासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले. आरक्षण लवकर जाहीर न झाल्यास यापुढचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात जवळपास दोनशे कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. या आंदोलनाच्या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक महेश शर्मा, फौजदार तरडे, जमादार बालाजी काळे, गोविंद चुडावकर, गजानन दुधाटे आदींनी चोख बंदोबस्त  ठेवला होता.