होमपेज › Marathwada › मराठा क्रांती मोर्चाची कार्यकर्ती मंदा सोळंकेचे अपघाती निधन

मराठा क्रांती मोर्चाची कार्यकर्ती मंदा सोळंकेचे अपघाती निधन

Published On: Sep 26 2018 10:57PM | Last Updated: Sep 26 2018 10:57PMबीड : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चातील धारदार वक्‍तृत्वाने महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात गाजलेल्या मंदा सुंदरराव सोळंके (19) हिचे बुधवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात एका अपघातामध्ये मंदा गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली.

वडवणी जवळील आमला या दुर्गम डोंगर भागातील रहिवाशी सुंदरराव सोळंके यांची ती मुलगी. आर्थिक परस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता.  मात्र वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन मिळणार्‍या बक्षिसाच्या रकमा व विविध प्रबोधनपर कार्यक्रमांच्या मानधनावर तिने बीड येथे आपले शिक्षण सुरू ठेवले होते. दोन वषार्र्ंपूर्वी राज्यात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात आपल्या कणखर आवाजाने मंदाने आसमंत दणाणून सोडला.  गेल्या आठवड्यात आपल्या मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी अनाथाश्रमात जाताना परळीजवळ वाहनाच्या धडकेत ती गंभीर जखमी झाली. 

मंदा सोळंके हिच्या मृत्यूची बातमी बुधवारी सायंकाळी वार्‍यासारखी महाराष्ट्रभर पसरली.  तिच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी आठ वाजता आमला येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मंदाच्या मागे आई वडिल, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.