Thu, Jun 04, 2020 13:16होमपेज › Marathwada › मराठा, धनगर आरक्षणप्रश्‍नी सरकारने फसवले : शरद पवार

मराठा, धनगर आरक्षणप्रश्‍नी सरकारने फसवले: पवार

Published On: Feb 24 2019 1:28AM | Last Updated: Feb 24 2019 1:34AM
परळी : प्रतिनिधी 

नोटबंदी, कर्जमाफ ी, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न या सरकारच्या काळात निर्माण झाले. केवळ घोषणा करणारे हे सरकार आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारने फसगत केली आहे. जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. सध्या राज्यातील शेतकर्‍यांसमोर दुष्काळाचे संकट आहे, या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची धमक सरकारमध्ये नाही. मी आजवर बीड जिल्ह्यात अनेक सभा घेतल्या, परंतु परळीतील ही सभा माझ्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीतील बीडमधील सर्वांत विराट सभा आहे. ही समारोप सभा हे सरकार घालविण्याची सुरुवात आहे. तुम्ही सर्वजण यासाठी आम्हाला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जनसमुदायाला केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या परिवर्तन यात्रेची समारोप सभा शनिवारी सायंकाळी परळीत झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, आ. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून सरकारवर तोफ  डागली. मला फडणवीस नकलाकार म्हणतात. त्यांनी सांगावं त्यांना माझं कोणतं वक्तव्य खटकलं? बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना बेळगाव असो, कारवार असो, मी लाठ्या काठ्या खाल्ल्या. अनेकदा जेलमध्ये गेलो. त्यामुळे मला तुरुंगवासाची धमकी दाखवू नका. पुलवामा हल्ला झाल्यावर काही तासांत मोदी, योगी सत्तेसाठी मतांची भीक मागत होते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर युतीच्या वाटाघाटी करत आहेत. याच वेळी प्रियंका गांधींनी त्यांची पत्रकार परिषद रद्द केली, याचा अर्थ परिपक्व कोण? असा सवालही भुजबळ यांनी यावेळी केला. सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

सरकारवर 302 चा गुन्हा का दाखल करू नये ? : अशोक चव्हाण

लोकांच्या मनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रक्षोभ आहे. समविचारी पक्षांना एका व्यासपीठावर आणून महाआघाडीसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. सर्वांच्या एकजुटीने निश्‍चितच हे सरकार घालवून टाकू. मुख्यमंत्री महोदय तुमचा अभ्यास खूप झाला, पण तुम्ही नापास झाला आहात. जनता तुम्हाला येत्या निवडणुकांत हे दाखवून देईल. राज्यात चौदा हजारांच्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या, मग फडणवीस सरकारवर 302 चा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.