Thu, Oct 17, 2019 13:28होमपेज › Marathwada › लातूर : व्हॅन पलटी होऊन विद्यार्थिनी ठार

लातूर : व्हॅन पलटी होऊन विद्यार्थिनी ठार

Published On: Feb 04 2019 4:19PM | Last Updated: Feb 04 2019 4:19PM
लातूर : प्रतिनिधी

शाळेची व्हॅन पलटी होऊन एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली. प्रियांका व्यंकट बोईनवाड (वय १९) असे तिचे नाव आहे. सोमवारी (दि. ४) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अवलकोंड रोड उदगीर येथे अपघात झाला.

उदगीर येथील आदित्य इंग्लिश स्कूलची (एमएच १२ एफसी ३२२१) ही बस उदगीरहून अवलकोंडा येथे विद्यार्थी आणण्यासाठी गेली होती. विद्यार्थी घेऊन येत असताना वाटेत प्रियांका बोईनवाड या विद्यार्थिनीने उदगीरला जाण्यासाठी हात दाखवून बस थांबवली. विद्यार्थिनी परिचयाची असल्याने बस चालकाने तिला बसमध्ये घेतले. भरधाव वेगात बस जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात जाऊन उलटली. त्यात प्रियांका जागीच ठार झाली, तर बसमधील सुमारे २० लहान विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. 

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदर व्हॅनला ९ अधिक १ चा परवाना असताना क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कसे बसवले गेले? याचा शोध पोलिस घेत आहेत.