Thu, Feb 20, 2020 07:44होमपेज › Marathwada › न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांना लातूरच्या  विधिज्ञांचा  पाठिंबा

न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांना लातूरच्या  विधिज्ञांचा  पाठिंबा

Published On: Sep 11 2019 12:25AM | Last Updated: Sep 11 2019 12:25AM
लातूर : प्रतिनिधी

लातूरच्या भूमिकन्या तथा मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांच्या बदली प्रकरणी लातूर जिल्हा वकील मंडळाने येत्या शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर)ला न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच न्या. ताहीलरमानी यांच्या बदलीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वकील मंडळाचे अध्यक्ष  ॲड. आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

न्या. विजया ताहिलरमानी यांची मेघालयाच्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. आपल्या बदलीचा फेरविचार व्हावा अशी विनंती ताहिलरमानी यांनी केली होती. तथापि, ती मान्य करण्यात न आल्याने न्या. ताहीलरमानी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवला आहे. हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. 
दरम्यान, मद्रास न्यायालयातील विधिज्ञांनीही ताहीलरमानी यांच्या मागणीला पाठिंबा देत कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. न्या. ताहिलरमानी  या उदगीर तालुक्यातील नळगीरच्या कन्या आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव कापसे असे आहे.

देशात मोजक्याच महिला या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश आहेत. ब्रिटिश काळापासून मद्रास उच्च न्यायालय हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उच्च न्यायालय आहे. तेथील  मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली सुमारे ७५ न्यायाधीश कार्यरत आहेत न्या. ताहीलरमानी या एक वर्षात निवृत्त होणार आहेत. त्यांची अशाप्रकारे तडकाफडकी बदली करणे योग्य वाटत नाही. 
ॲड. उदय गवारे