होमपेज › Marathwada › भूसंपादनाच्या पैशांवरून भावा-भावांत उभी ‘दिवार’

भूसंपादनाच्या पैशांवरून भावा-भावांत उभी ‘दिवार’

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:44PMबीड : दिनेश गुळवे

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गसह रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. या भूसंपादनापोटी एका-एका परिवाराला दहा लाख ते 50 लाखांपर्यंत पैसे मिळाले आहेत. या पैशांच्या वाटणीवरून मात्र भावा-भावांमध्ये कटुता निर्माण होऊन नात्यात दिवार तयार झाली आहे. अनेक घरामध्ये बहीण-भाऊ, वडील-मुलगा यांच्यातही वाद होऊन हे वाद पोलिस ठाणे, न्यायालयापर्यंत गेले आहेत. 

बीड जिल्ह्यात सोलापूर-धुळे, कल्याण-निर्मल, शिर्डी-अंबाजोगाई, माजलगाव-केज, धारूर, परळी या तालुक्यात राष्ट्रीय महामागर्च काम सुरू आहेत. जिल्ह्यात आठ राष्ट्रीय महामार्ग होत असून रेल्वेमार्गाचेही काम होत आहे. या कामासाठी प्र्रशासनाने दोन हजार हेक्टर जमीन संपादित केली असून आणखी जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना दीड हजार कोटी रुपयांवर मावेजा वाटप करण्यात आला आहे. 

एका-एका शेतकरी कुटुंबाला मावेजापोटी दहा लाखांपासून ते थेट 50 लाखांपर्यंतचा मावेजा मिळालेला आहे. या पैशांच्या वाटणीवरून भावा-भावात वाद सुरू असल्याचे अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. एवढेच नाही तर लग्न झालेल्या बहिणीनेही मावेजावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे बहीण-भावाच्या नात्यातही कटुता निर्माण झाली आहे. काही कुटुंबामध्ये या आलेल्या पैशांची वाटणी सामोपचाराने करण्यात आली, पैशांतील हिस्सा विवाहित मुलींनाही देण्यात आला. असे असले तरी काही ठिकाणी मात्र हा वाद थेट पोलिस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत गेला आहे. मावेजाचा पैसा मोठा आला, मात्र या पैशातून अनेक घरात वादही उद्भवल्याचे दिसून येत आहे.