होमपेज › Marathwada › कोल्हापूरचा ‘आर्या गँग’प्रमुख ताब्यात

कोल्हापूरचा ‘आर्या गँग’प्रमुख ताब्यात

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:06AMबीड : प्रतिनिधी

 सोन्या-चांदीचे दागिने बॅगमध्ये दुचाकीवरून घरी नेत असणार्‍या केजच्या सराफा व्यापार्‍याच्या वाहनास कारने जोराची धडक देऊन त्यांच्याजवळील बॅग चौघांनी पळवून नेली. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास केजजवळ घडली होती. पोलिसांनी तप्परता दाखवित सिनेस्टाईल पद्धतीने चोरट्यांचा पाठलाग करत चौघांना अवघ्या चार तासात पकडले. सदरील चार आरोपी हे कुख्यात गुंड असून त्यात कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’ टोळी प्रमुखाचा समावेश आहे. 

  विकास थोरात असे त्या मृत सराफा व्यापार्‍याचे नाव असून त्यांचे केजमध्ये सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून कुंबेफळ या आपल्या गावी दुचाकीवरून निघाले होते. पाळत ठेवून असलेल्या आर्या गँगचा म्होरक्या अमोल ऊर्फ आर्याभाई संभाजी मोहिते (35 रा.कापशी ता.कागल, जि.कोल्हापूर) व इतर तिघे अमर लक्ष्मण सुतार (39 रा.महादेव गल्ली रा.निपाणी जि.बेळगाव), महादेव रमेश डोंगरे, (21 रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड), अतुल रमेश जोगदंड (20 रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड) यांनी त्यांचा कारद्वारे पाठलाग केला. केज शहरापासून काही अंतरावर येताच चोरट्यांनीकारने थोरात यांच्या दुचाकीला पाठिमागून वेगाने धडक दिली. यामध्ये विकास थोरात खाली पडले आणि डोक्याला मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. प्रथमतः अपघात झाल्याची माहिती तत्काळ केज पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक एस. जे. माने हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले, मात्र कार चालक पळून जात असल्याचा मेसेज वायरलेसवरून पोलिसांना दिला गेला. एस. जे.  माने यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे     यांना दिली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत वायरलेसवरून परिसरातील ठाणे प्रभारींना संदेश देत नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी धनेगावच्या दिशेन पळाल्याचे काही नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग केला. यामध्ये टोळीचा म्होरक्या अमोल मोहिते हा जवळीलच एका विहिरीत पडला तर इतर तिघे पळून गेले. स्थानिकांनी ही माहिती युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांना दिली. त्यांनी तेथे धाव घेत अमोलला बेड्या ठोकल्या. तर इतर तिघांच्या शोधात पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी रवाना झाले.   पहाटेच्या सुमारास इतर तीनही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. या आरोपींनी लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अजित बोजहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, धारूरचे पोलिस निरीक्षक जे. एल. तेली, केजचे पोलिस निरीक्षक एस. जे. माने, अंबाजोगाई ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंधम, युसूफवडगावचे सपोनि राहुल देशपांडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.