Sat, Jun 06, 2020 17:12होमपेज › Marathwada › सहकार विभागाच्या दुर्गप्रेमींनी केले कळसूबाई शिखर सर

सहकार विभागाच्या दुर्गप्रेमींनी केले कळसूबाई शिखर सर

Published On: Dec 13 2018 1:36AM | Last Updated: Dec 13 2018 12:23AM
परभणी : प्रतिनिधी

औरंगाबाद विभागातील सहकार अधिकारी-कर्मचार्‍यांच्या मित्रसमूहातील 17 दुर्गप्रेमींनी  महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असलेले कळसूबाई हे शिखर नुकतेच सर केले. विशेष म्हणजे आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाच्या सांधण व्हॅली (दरी)त उतरण्याचा रोमांचक अनुभवही या ट्रेकर्संनी घेतला. 

सदर मोहीम सहकार ग्रुपचे प्रमुख जिल्हा उपनिबंधक देविदास पालोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 ते 9 डिसेंबर रोजी पार पडली. यात परभणीतून स्वराज्य ट्रेकर्सचे माधव यादव, नांदेडमधून किशोर दुधमल यांनी सहभाग नोंदविला. तसेच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे, विनायक धोटे, अरविंद गोरे, प्रशांत सदाफुले, महेंद्र देशमुख, लक्ष्मीकांत वानखेडे, भरत जाधव, शकील पठाण, बलराम नवथर, प्रवीण खंडागळे, राजू टेकाळे, किशोर इंगळे, सचिन जाधव आणि प्रवीण काथार यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. 

केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता कळसूबाई शिखरावर पोहोचली. या सर्वांनाच दुर्ग भ्रमंतीची प्रचंड आवड आहे.यातील काहीजण वयाची पन्नाशी गाठलेले आहेत. मात्र, त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. कळसूबाई शिखरावर पोहोचल्यावर सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता.  दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून विरंगुळा म्हणून  स्वतःच्या क्षमता तपासणीसाठी ही मोहीम आयोजित केल्याचे  उपनिबंधक पालोदकर यांनी सांगितले. तसेच शिखर मार्गाची होणारी धूप आणि  होत असलेला प्लास्टीकचा कचरा ही बाब चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. 

परभणीतील माधव यादव यांनी सांगितले की, निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांधण दरी हे आश्चर्यच. गेल्या वर्षीपर्यंत मलाही हे आश्चर्य माहीत नव्हतं. सहकारमधील ट्रेकर्स मित्रांमुळे सांधण दरीची खरी ओळख झाली. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. काही मित्र त्या ठिकाणी ट्रेकसाठी जाणार असल्याचं कळलं आणि आपणही तिथे जायचं हे मनात पक्कं केलं होतं. त्यानुसार हा ट्रेक यशस्वी झाला. प्रत्येक दुर्गप्रेमी तरुणांनी एकदा तरी हे शिखर सर करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.