Sat, Jun 06, 2020 17:25होमपेज › Marathwada › सहामन ज्वारी अन् पाचमन मजुरी 

सहामन ज्वारी अन् पाचमन मजुरी 

Published On: Mar 12 2018 1:17AM | Last Updated: Mar 12 2018 1:13AMवडवणीः अशोक निपटे

तालुक्यात शेती उत्पादनात मोठी घट झाली असतानाच मजुरांचाही तुटवडा जाणवत आहे. शेतकर्‍याला उत्पादित झालेल्या मालापैकी बहुतांशी माल मजुरांना द्यावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

निसर्गाची अवकृपेने अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरे वाढत्या मजुरीने बेजार झाले आहे. सध्या ज्वारी, हरभरा, गहू पिकाची काढणी आणि मळणीचे दिवस चालू आहेत. ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या वडवणी तालुक्यातील बहुतांशी गावातील मजूर परप्रांतात ऊसतोडणीसाठी गेलेले आहे. त्यामुळे येथील शेती कामासाठी मजुरांचा वानवा निर्माण झाला आहे. 

ज्वारी, हरभरा, गहू, जवसाचे पीक काढणी व खळी करण्याचे कामे चालू आहेत, मात्र हे कामे करण्यासाठी मजुरांना मजुरी देण्याएवढाही उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. पिंपरखेड येथील शेतकरी पांडूरंग दत्तात्रय निपटे यांच्या दीड एकर शेतात ज्वारीचे पीक होते. 

सदर पिकाची उपटणी व खळी करण्यासाठी त्यांनी मजुरांना बोलावले. पाच मन ज्वारी मजुरीपोटी देण्याचे ठरले. गावातील मजुरांनी ज्वारीची उपटणी केली. नंतर खळे केले.  खळे झाल्यानंतर मळणीयंत्रातून निघालेली ज्वारीच्या धान्याची मोजणी केली असता सहा मन ज्वारी भरली. या सहा मन ज्वारीपैकी पाच मन ज्वारी मजुरांना वाटून देण्यात आली व उर्वरित एक मन ज्वारी पांडुरंग निपटे यांनी घरी नेली. 

शेती व्यवसाय संकटात
शेती व्यवसाय सध्या संकटात आला आहे. शेतीच्या उत्पादनातून खर्च देखील निघाला नाही. शेतमालाला योग्य भाव नसल्याने मजुरी देणे देखील अवघड झाले आहे. 
     - पप्पू निपटे, शेतकरी

मालाला भाव तर नाहीच उलट नियमांच्या कचाट्यात अडकल्याने शेतकरी वैतागले आहे. उत्पादन निघत नसल्याने मजुरी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेती पडक ठेवलेली बरी.
- नरेंद्र घुमरे, शेतकरी पिंपरखेड

शेतमालाला भाव वाढला पाहिजे
 शेतमजुरांना शेतात राब राबावे लागते. मात्र शेतमालाला चांगला भाव नसल्याने मजुरी देणे शेतकर्‍यांना परवडत नाही. जर भाव वाढला तर शेतमजुरी देणे परवडेल. 
     - आसाराम ढगे, शेतकरी