Thu, Jun 04, 2020 23:17होमपेज › Marathwada › दवाखान्यात डॉक्टर नसल्याने उपचारांपासून रुग्ण वंचित

दवाखान्यात डॉक्टर नसल्याने उपचारांपासून रुग्ण वंचित

Published On: Dec 31 2018 1:47AM | Last Updated: Dec 31 2018 1:06AM
बीड : प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथील प्राथमिक आरोग्य पथकातील डॉक्टर, कर्मचारी विविध कारणे सांगून सतत गैरहजर रहात असल्याने ग्रामीण भागातून आलेले रुग्ण उपचारांपासून वंचित रहात आहेत. गंभीर बाब म्हणजे यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतरही येथील कारभार आवो जावो घर तुम्हारा असाच आहे.

शिरसमार्ग येथे गेल्या 25 वर्षांपासून आरोग्य पथक आहे. जिल्ह्यातील इतर काही आरोग्य पथकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिल्यानंतरही हे आरोग्य पथक जैसे थेच आहे. येथे चार महिन्यांपासून कायमस्वरुपी डॉक्टर नसून सध्या डॉ. लांजेवार यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. यासह येथील औषध निर्माता हेही कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करीत आहेत. यासह शिपाई व इतर काही जागा रिक्त आहेत. या रुग्णालयास शिरसमार्गसह तरटेवाडी, काळेवाडी, तांदळवाडी, बहाद्दरपूर, दिमाखवाडीसह इतर काही गावांमधील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, येथे अनेकदा डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांना उपचार मिळत नाही. गंभीर बाब म्हणजे अनेकदा आजारांवर सिस्टरसह इतर कर्मचारीची औषोधोपचार करतात. येथील हा प्रकार सरपंचासह ग्रामस्थांनी वारंवार वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितला आहे. मात्र, यानंतरही यंत्रणेवर कसलाच फरक पडलेला नाही. शनिवारी येथील रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी आले होते, मात्र रुग्णालयात कोणीच नसल्याने त्यांना वाट पाहून परतावे लागले.

रुग्णांचे वाली कोण?

शिरसमार्ग येथील आरोग्य पथकामध्ये अनेकदा कोणीच उपस्थित रहात नसल्याने रुग्णांचे वाली कोण? असा प्रश्‍न सरपंच अनिता वखरे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात डॉ. लांजेवार म्हणाले की, आपण लसीकरण कामासाठी बाहेर आहोत, रुग्णालयात कोणीच नसल्याचे त्यांनीही आश्‍चर्य व्यक्त केले, तर यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार म्हणाले, शासनाने डॉक्टरची जागा भरल्यानंतर कायम डॉक्टर देऊ.