Sat, Jun 06, 2020 16:54होमपेज › Marathwada › घरकुल गैरव्यवहाराची इन कॅमेरा चौकशी

घरकुल गैरव्यवहाराची इन कॅमेरा चौकशी

Published On: May 03 2019 2:05AM | Last Updated: May 02 2019 11:48PM
नळदुर्ग ः शिवाजी नाईक

2008 मध्ये नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या घरकुलांसह गटार, रस्ता बांधकामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींवरून औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी गठित केलेल्या समितीकडून नळदुर्ग न.प.चे तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमक्ष गुरुवारी घरकुलांच्या बांधकामाची चौकशी इन कॅमेरा सुरू झाली आहे. ही चौकशी सलग तीन दिवस चालणार  असल्याने संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास निर्मूलन (आयएचएसडीपी) योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुल व इतर कामांबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी संबंधित कंत्राटदार, तत्कालीन पदाधिकारी, मुख्याधिकारी, अभियंता, सल्लागार एजन्सी यांच्यासमक्ष चाचण्या घेऊन व संयुक्त मोजणी करून घरनिहाय कामाचे मूल्यांकन करण्यात येत आहे.  

यासंबंधी तत्कालीन पदाधिकारी, नगर अभियंता, मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांना नगरपालिकेचे  विद्यमान मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नोटीस बजावून 2 मे रोजी नगरपालिकेत उपस्थित राहण्यास कळविले होते. गुरुवार, 2 मे रोजी विभागीय आयुक्त यांनी गठित केलेल्या समितीच्या प्रमुखासह सदस्यांच्या उपस्थितीत व तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमक्ष बांधण्यात आलेल्या घरकुलांच्या बांधकामाची, रस्ता आणि गटार बांधकामाची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये घरकुलांच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या गटार बांधकामाची खोदाई करून त्याची लांबी, रुंदी व उंची त्यांच्या अंदाजपत्रकानुसार चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी करीत असताना अंदाजपत्रकानुसार बांधण्यात आलेल्या घरकुलाचे बांधकाम झाले आहे किंवा नाही याची चौकशी करण्यात येत आहे.

दुपारी वसंतनगर येथील घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या गटार व रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले.  इंदिरानगर, दुर्गानगर, बौद्धनगर आदी ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरकुलांचीही चौकशी करण्यात येणार आहे.     
         
या सर्वांच्या उपस्थितीत व तत्कालीन नगराध्यक्ष उदय जगदाळे, तत्कालीन नगराध्यक्षा निर्मलाताई गायकवाड, तत्कालीन मुख्याधिकारी दिलीप देशमुख, तत्कालीन नगरअभियंता ए. आर. खान, विद्यमान मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत ही चौकशी करण्यात आली. घरकुल गैरव्यवहारप्रकरणी अखेर चौकशी सुरु झाल्याने लवकरच या प्रकरणातील सत्यता बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

यांचा आहे समितीत समावेश

विभागीय आयुक्तांनी गठित केलेल्या तांत्रिक समितीत समितीचे प्रमुख औरंगाबाद ‘म्हाडा’चे कार्यकारी अभियंता व्ही. पी. केदारे, उस्मानाबाद ‘म्हाडा’चे उपअभियंता मिलींद अटकळे, उपअभियंता औरंगाबाद एस. जी. कुलकर्णी, नगर अभियंता राजेंद्र वाघमारे, मदतनीस ए. जे. राऊत, ए. बी. माने, ओ. एन. जोशी यांचा समावेश आहे.