Thu, Jun 04, 2020 23:06होमपेज › Marathwada › गोपीनाथ गडावर आरोग्य यज्ञ

गोपीनाथ गडावर आरोग्य यज्ञ

Published On: Dec 12 2018 1:53AM | Last Updated: Dec 12 2018 1:35AM
परळी : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आज 12 डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते  होणार आहे. 

खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराची संपूर्ण जय्यत तयारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित, पीडित घटकांना आधार देण्याचे काम केले जाते. यावर्षी  जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या हातात पैसा नाही, अशा स्थितीत गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री पंकजा  मुंडे व खा. डॉ.प्रीतम मुंडे यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून लोकनेत्याची जयंती साजरी करण्याचे ठरवले आहे.

12 व 13 डिसेंबर अशा दोन्ही दिवशी हे शिबीर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान, गोपीनाथ गडावर  होणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस,  आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या उपस्थितीत शिबीराचा शुभारंभ होणार आहे.  

200 डॉक्टर्स, 40 स्टॉल

अंबाजोगाई येथील स्वा.रा.तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाबरोबर जिल्हा व उप जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातील सुमारे दोनशे डॉक्टर्स शिबिरात सहभागी होऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यासाठी गोपीनाथ गडावर चाळीस स्टॉल्स उभारण्यात आले असून पुरुष, स्त्रिया व लहान मुलांची स्वतंत्रपणे तपासणीची सोय करण्यात आली आहे.
शिबिरात मुख कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, लिव्हर, किडनी या आजारांची तपासणी तसेच पुरूष व स्त्रियांसाठी हार्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भपिशवी, दुर्बिणीद्वारे बिनटाक्याचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणावर उपचार, चष्मे वाटप, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रियाबरोबरच हाडांच्या ठिसूळपणाची चाचणी व कृत्रिम अवयवांचे वाटप होणार आहे. शिबिराचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.