Thu, Jun 04, 2020 21:52होमपेज › Marathwada › अपंग मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून

अपंग मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून

Published On: May 10 2018 6:55PM | Last Updated: May 10 2018 6:54PMगेवराई (जि. बीड) : प्रतिनिधी

घराच्या अंगणात बाजेवर झोपलेल्या एका पंधरा वर्षीय अपंग मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन झोपेतच खून केल्याची दुर्देवी घटना गेवराई तालुक्यातील टकलेवाडी येथे बुधवारी मध्यरात्री घडली. कृष्णा खंडू दाताळ असे खून झालेल्‍या मुलाचे नाव आहे. कृष्‍णा याची हत्या भावकीत असलेल्या जमीनीच्या वादातून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबाबत चार आरोपींविरोधात चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी, खंडु विष्णू दाताळ व महादेव विठ्ठल दाताळ (दोघे राहणार टकलेवाडी) यांच्यामध्ये जमीनीचा वाद आहे. या जमीनीच्या वादातून दोन्ही गटात नेहमीच वादावादी होत असे. दरम्यान बुधवारी दुपारी खंडु दाताळ यांनी शेती नांगरण्यासाठी ट्रॅक्टर आणले होते. यावरून दोन गटात जुंपल्याने घटनास्थळावरून खंडू दाताळ हे निघून आले होते. बुधवारी मध्यरात्री खंडु दाताळ यांना मारण्यासाठी महादेव विठ्ठल दाताळ, परशूराम विठ्ठल दाताळ, लक्ष्मण विठ्ठल दाताळ आणि रामदास विठ्ठल दाताळ हे चौघे जण आले. घराच्या बाहेर खंडु यांचा अपंग मुलगा कृष्णा झोपला होता. झोपलेला खंडु दाताळच आहे, असे समजून मुलावर या चौघा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवत गळा चिरला. यामध्ये कृष्णा जागीच ठार झाला. या घटनेने तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनास्थळी चकलांबा पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन चकलांबा आरोग्य केंद्रात मयताचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी महादेव दाताळ, परशूराम दाताळ आणि रामदास दाताळ या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी संशयीत चार आरोपीपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या दोन्ही कुटुंबामध्ये यापूर्वी देखील परस्परविरोधी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी दिली.