Sat, Jun 06, 2020 16:03होमपेज › Marathwada › बर्दापूर हद्दीत सव्वा सहा लाखांचा गुटखा जप्त 

बर्दापूर हद्दीत सव्वा सहा लाखांचा गुटखा जप्त 

Published On: Aug 31 2019 7:19PM | Last Updated: Aug 31 2019 7:19PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाईतील बर्दापूर हद्दीत बीडच्या अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत सुमारे सव्वा सहा लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई बर्दापूर हद्दीतील साळुंकवाडी शिवारात विनापरवाना आणि बेकायदेशीर वाहतूक करताना करण्यात आली. या प्रकरणी सुरेश दत्तात्रेय खांडापूरे (रा.साळुंकवाडी ता.अंबाजोगाई) याच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, सर्व प्रकारच्या गुटख्यांवर आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर शासनाने संपूर्णतः बंदी घातली आहे. तरीही अधिका-यांना चिरीमिरी देऊन गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसते. गुटखा व सुगंधी तंबाखू सर्रासपणे सर्वत्र ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. शहरी भागासह ग्रामीण भागात आणि वाडी तांड्यांवर विविध प्रकारच्या गुटख्याची खुलेआम विक्री होते आहे. 

बर्दापूर हद्दीतील साळुंकवाडी शिवारातून विविध प्रकारच्या गुटख्याची विनापरवाना व बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याची खबर अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ सापळा रचून गुटखा वाहून नेणारे वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, केलेल्या कारवाईमध्ये गोवा गुटखा २३ बॅग, बाबा गुटखा तीन बॅग, राज निवास चार बॅग, विमल गुटखा बारा बॅग व वाहन असा एकूण सहा लाख सतरा हजार तीनशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भगवानराव भिसे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रेय खांडापुरे याच्याविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.