Sun, Jun 07, 2020 08:58होमपेज › Marathwada › ‘उभारी’द्वारे शेतकरी  कुटुंबीयांची पुनर्भेट

‘उभारी’द्वारे शेतकरी  कुटुंबीयांची पुनर्भेट

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:06PMपरभणी : प्रदीप कांबळे

आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासनाने उभारी उपक्रमांतर्गत पुनर्भेट कार्यक्रम 4 एप्रिल रोजी जिल्हाभरात राबवला. 1 जानेवारी 2012 पासून ते 30 मार्च 2018 पर्यंत तब्बल 478 शेतकर्‍यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्येच्या संकटातून शेतकर्‍यांना वर काढण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील असून शाश्‍वत स्वरूपाच्या उपाययोजना करण्यासाठी तसेच शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 

प्रशासनातील 325 कर्मचारी  व 39 स्वयंसेवी संस्थांचे 107 प्रतिनिधी यांच्या पथकाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या गावात जाऊन कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या आहेत.  6 एप्रिलपर्यंत 449 कुटुंबीयांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यानंतर29 कुटुंबीयांच्या भेटी घेतल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली आहे. सततचा दुष्काळ व नापिकी, कर्जबाजारीपणामुळे  आर्थिक संकटाचा सामना करताना हताश झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला.  नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त शेतीची संकल्पना  अंतर्भूत व्हावी यासाठी शासन-प्रशासन कार्य करीत आहे, परंतु वाढत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा ही चिंतेची बाब असल्याने  त्या रोखण्यासाठी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या भेटीचा  15 नोव्हेंबर 2017 रोजी कार्यक्रम राबवला. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्थिती जाणून घेऊन त्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली होती, परंतु त्यानंतरही जिल्ह्यात 32 शेतकर्‍यांनी आत्महत्या  केल्या आहेत.  आत्महत्याग्रस्तांचे कुटुंब नव्याने उभे व्हावे यासाठी प्रशासनाने  शेतकर्‍यांशी संवाद साधावा, असे आदेशच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्‍तम भापकर यांनी दिल्याने  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या पुन्हा भेटी घेऊन त्यांच्या आर्थिक स्थितीनुरूप आढावा  शासनाकडे पाठविण्यात येत आहे.  

Tags : Marathwada, Governance, administration, strive, bring, farmers, out,  crisis,  suicide