Mon, Jun 01, 2020 17:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › वंजारी आरक्षण प्रश्‍नावर भगवानगडावर  बैठक

वंजारी आरक्षण प्रश्‍नावर भगवानगडावर  बैठक

Published On: Aug 27 2018 1:15AM | Last Updated: Aug 26 2018 11:34PMपरळी : प्रतिनिधी

वंजारी समाज 2 टक्के आरक्षणात असमाधानी असून आम्हाला ओबीसीमध्ये टाकून त्या सवलती द्याव्यात, अशी मागणी भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केली आहे, संत श्री भगवानबाबा जन्मदिनाचे औचित्य साधून भगवानगडावर या संदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाणार आहे. गडावर कोणतेही व्यासपीठ अथवा सभा होणार नसून  समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केली आहे. 

वंजारी समाज 2 टक्के आरक्षणात असमाधानी असून ज्यावेळेला समाज एनटीची मागणी करीत होता तेव्हा एनटीमध्ये प्रवर्ग नव्हते. नंतर राज्य सरकारने प्रवर्ग पाडले. बिंदू नामावलीत एनटी अ, ब, क,ड असे प्रवर्ग पाडून समाजात फूट पाडण्यात आली. अ म्हणजे विमुक्त, ब म्हणजे भटके, क म्हणजे धनगर आणि ड म्हणजे वंजारी असे प्रवर्ग पाडल्यामुळे वंजारी समाजाच्या वाट्याला 100 पैकी केवळ 2 टक्के जागा आल्या. 49 मध्ये तर एकही जागा नसल्याने ओपनमध्ये मेरिट असून सुद्धा मेडिकल, इंजिनिअर, स्पर्धा परीक्षेलासुद्धा वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने न्याय मिळत नसल्याचे फुलचंद कराड म्हणाले. 

मार्क जास्त असले तरी, मेरिटमध्ये जरी आला तरी त्याला एनटी प्रवर्गात जागा नसल्याने अडचणी येत आहेत.  वंजारी समाज केंद्र सरकारमध्ये ओबीसीमध्ये आहोत. महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांत ओबीसीमध्येच आहोत. आमच्या लोकसंख्येच्या मानाने 9 ते 10 टक्के जागा आम्हाला बसतात. त्यामुळे वंजारी समाजास ओबीसीमध्ये टाकून सवलती द्याव्यात अशी आमची मागणी असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या कुठल्याही पदभरतीत वंजारी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, परंतु राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागांमध्ये एनटी डी मध्ये समावेश होतो. या प्रवर्गासाठी अवघ्या 2 टक्के जागा असल्याने वंजारी तरुणांवर अन्याय होत असल्याची भावना समाजबांधवांमध्ये आहे. गत काही दिवसांपासून राज्यभरात याविषयी आंदोलन करण्याची मागणी पुढे येत होती. आता 31 तारखेला याच प्रश्‍नावर भगवानगडावर बैठक होणार असल्याने यातून काय दिशा ठरते, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.