Sat, Jun 06, 2020 21:51होमपेज › Marathwada › ‘टाटा’, ‘कोयना’तील ११६ टीएमसी पाणी द्या

‘टाटा’, ‘कोयना’तील ११६ टीएमसी पाणी द्या

Published On: Feb 14 2019 1:35AM | Last Updated: Feb 14 2019 12:08AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

ब्रिटिश सत्तेशी करार करून मुंबईसाठी लागणार्‍या विजेची निर्मिती करणार्‍या टाटा कंपनीच्या ताब्यातील 116 टीएमसी पाणी पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, असा ठराव नगरपालिकेने सरकारला सादर केला आहे. यामुळे या पाणी आंदोलनालाही मोठे बळ मिळाले आहे. 

टाटा व कोयना धरणातील पाणी नैसर्गिक हक्काने उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, वाशी, भूम आणि कळंब या दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळावे, यासाठी उस्मानाबाद पालिकेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी एक तारखेच्या सर्वसाधारणसभेत ऐनवेळचा विषय म्हणून हा ठराव मांडला होता. त्याला विरोधी पक्षांसह सर्वांनीच अनुमोदन देत ठराव संमत केला होता. आता तो सरकारदरबारी पाठविला आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश सत्तेशी करार करून टाटा कंपनीने लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी, मुळशी या सहा धरणांत कृष्णा खोर्‍यातील के-5 या अत्यंत तुटीच्या खोर्‍यातील 48.97 टीएमसी पाणी अडवले आहे. या पाण्यावर 447 मेगावॅट वीजनिर्मिती करून मुंबईला ती वीज विकण्याचा व्यवसाय टाटा कंपनी शंभर वर्षांपासून करीत आहे. या धरणातील 48.97 टीएमसी पाणी व कोयना धरणातील 67.5 टीएमसी पाणी असे एकूण 116 टीएमसी पाणी वीजनिर्मिती वापरण्याऐवजी ते दुष्काळग्रस्त भागाला (पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा भाग) द्यावे यासाठी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. तसा अभ्यासपूर्ण अहवालही त्यांनी राज्य सरकारला सादर केलेला आहे. या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, असा आग्रह या ठरावात धरला आहे. जिल्ह्यात शहरीकरण वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे. आहे ते पाणी कमी पडत आहे. त्यामुळे सरकारने हे पाणी टाटा कंपनीच्या तावडीतून सोडवून घ्यावे व ते दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, असेही म्हटले आहे.