Sun, Jun 07, 2020 15:39होमपेज › Marathwada › गॅस सिलेंडरच्या स्फोटात लेकीसह माता पित्याचा मृत्यू

गॅस सिलेंडरच्या स्फोटात लेकीसह माता पित्याचा मृत्यू

Published On: May 03 2019 8:24AM | Last Updated: May 03 2019 8:29AM
वसमत : प्रतिनिधी

कुरूंदा येथे काल, गुरूवारी (दि. २) मध्यरात्री सोनाजी आनंदराव दळवी यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरास लागलेल्या आगीत पती, पत्नी आणि डॉक्टर मुलगी असा तिघांचा मृत्यू झाला. घराला लागलेली ही आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाला तब्बल सहा तासानंतर यश आले. 

सोनाजी आनंदराव दळवी (वय ५५), पत्नी सुरेखा दळवी (वय ५०) आणि मुलगी डॉ. पुजा दळवी (वय २५) अशी मृताची नावे आहेत. पूजा ही पुणे येथे बी.एच.एम.एस चे वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती एका लग्नानिमित्त गावाकडे आली होती. या दुर्दैवी घटनेत तीचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कुरुंदा गावावर शोककळा पसरली.

सोनाजी दळवी यांच्या घरी गँस स्फोट झाला. या स्फोटात घराला आग लागली. पाहाता पाहाता आगीने उग्र रुप धारण केले. यावेळी शेजारील व गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग विझवण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती वसमत येथील अग्निशामक दलास देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाला तब्बल सहा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या आगीत मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह सकाळी ७.३० वा. बाहेर काढण्यात आले. आग विझविण्यासाठी नागरिकांनी रात्रभर प्रयत्न केले होते.