Sun, May 31, 2020 02:33होमपेज › Marathwada › बीडमध्ये उमेदवारांना जनता देते निधी

बीडमध्ये उमेदवारांना जनता देते निधी

Published On: Apr 12 2019 2:06AM | Last Updated: Apr 12 2019 1:33AM
बीड : दिनेश गुळवे

निवडणूक म्हटले की पैशांचा महापूर... कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षा, असे वातावरण असते. उमेदवारांकडून पैशांसह खाणेपिणे-दारू यांचा महापूर आणला जातो. असे असले तरी बीडकरांनी मात्र जनतेसाठी लढणार्‍या उमेदवारांना निवडणूक निधी देण्याची परंपरा पूर्वावार जपली आहे, ती आजही दिसून येते. 

निवडणूक प्रचार म्हटले की, एखादी गाडी व त्याही अगोदर पायी किंवा सायकलवर फिरून प्रचार केल्याचे बीड जिल्ह्यात अनेकदा दिसून आले. आता काळाच्या ओघात उमेदवार 40 ते 50 लाखांच्या गाडीमधून प्रचार करीत आहेत, त्यांच्यासह 15 ते 25 गाड्यांचा ताफा दिसून येतो. यासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना गाड्या, हार-तुर्‍यांचा खर्च, नेते-कार्यकर्त्यांचा नाश्ता, चहा-पाणी, जेवण नि दारू यावरही मोठा खर्च केला जातो. एवढेच नव्हे तर अनेकदा गावोगाव दारूचा महापूर आणला जातो. यामुळे प्रत्यक्षात मात्र कमी दाखविला जात असला तरी निवडणूक  खर्च कोट्यवधी रुपयांवर जात असल्याचे दिसून येत आहे. 

बीड जिल्ह्यात आजवर तीन नेत्यांना जनतेने भरभरून पैसे दिले आहेत. त्यामुळे त्यांना निवडूनही येता आले आहे. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, कॉ. गंगाधर आप्पा बुरांडे व बबनराव ढाकणे यांचा समावेश आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांना शेतकर्‍यांसाठी मोठे कार्य केले आहे, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात नवखे असतानाही अनेकांनी निधी दिला. तर, कॉ. गंगाधर आप्पा बुरांडे यांच्यासाठी तर अंबाजोगाई शहरात फेरी करून निधी जमा करून त्यांना देण्यात आला. यासह इतर ठिकाणीही त्यांना असाच जमा करून निधी दिला. यानंतर ऊसतोड कामगाराचा विषय पहिल्यांदा हाती घेतलेले बबनराव ढाकणे यांनाही शेतकरी, मजूर, व्यावसायिक आदींनी निधी दिला होता. मतदारांनी असा केवळ निधीच दिला नाही, तर भरभरून मतदानही केले. त्यामुळे त्यांना निवडूनही येता आले. बीड जिल्ह्यातील मतदार निधी देण्याची ही परंपरा आजही जपत आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर कालिदास आपेट यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍नही सोडविले आहेत. त्यामुळे त्यांना आजही शेतकरी आपापल्या परीने आर्थिक मदत करीत आहेत. 

क्रांतिसिंह पाटलांची उधळली सभा

1967 च्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रचार सभा गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे आयोजित करण्यात आली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रतिसरकार म्हणून उल्लेख केला जात असे. त्यामुळे बीड जिल्ह्यात त्यांच्या सभांना गर्दी तर होत, शिवाय त्यांना निधीही दिला जात असे. असे असले तरी गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे मात्र त्यांची सभा उधळून लावण्यात आली होती. 

मुंडे यांना आजीने दिले पाचशे रुपये

स्व. गोपीनाथ मुंडे हे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करीत असताना ते आष्टी मतदार संघातील एका छोट्या हॉटेलवर थांबून मतदारांशी संवाद करीत होते. यावेळी त्यांना चहा विक्रेत्या आजीबाईने पाचशे रुपयांची मदत निवडणूक लढविण्यासाठी केली होती. स्व. मुंडे या मदतीचा उल्लेख अनेकदा करीत.