Sun, Jun 07, 2020 08:42होमपेज › Marathwada › माजी खासदार दूधगावकर यांना भूखंडप्रकरणी अटक

माजी खासदार दूधगावकर यांना भूखंडप्रकरणी अटक

Published On: Oct 16 2018 1:42AM | Last Updated: Oct 16 2018 12:18AMपरभणी : प्रतिनिधी

ज्ञानोपासक महाविद्यालयातील 135 कर्मचार्‍यांनी स्वतःची घरे बांधण्यासाठी खरेदी केलेली जमीन संस्थाध्यक्षाने तलाठी व इतरांना हाताशी धरून हडप केल्याचे प्रकरण नानलपेठ पोलिसांत दाखल आहे. या प्रकरणात तलाठ्यास पोलिसांनी शुक्रवारी अटक  केली होती.  सोमवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता माजी खासदार व माजी मंत्री अ‍ॅड. गणेशराव दूधगावकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी दिली.

ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. सोळुंके यांच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात माजी खासदार दूधगावकर, तलाठी दत्तात्रय कदम, सेवानिवृत्त तलाठी रावसाहेब पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसीलदार वि. गो. गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तलाठी कदम यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी त्याला 12 ऑक्टोबर रोजी अटक करून, शनिवारी न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. सोमवारी याच गुन्ह्यात आरोपी असलेले माजी मंत्री अ‍ॅड. गणेशराव दूधगावकर यांना अटक झाली आहे. त्यांना न्यायायलयासमोर हजर करण्यात येणार आहे.