Sat, Jun 06, 2020 23:57होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांच्या खात्यावरील रक्‍कम परस्पर उचलली

शेतकर्‍यांच्या खात्यावरील रक्‍कम परस्पर उचलली

Published On: Dec 13 2018 1:36AM | Last Updated: Dec 13 2018 12:33AM
माजलगाव : प्रतिनिधी

येथील जुन्या मोंढ्यातील जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकर्‍यांच्या खात्यातील रक्‍कम परस्पर गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन शेतकर्‍यांच्या खात्यातील रक्‍कम परस्पर उचलण्यात आली आहे. दुष्काळाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. आजचा दिवस गेला उद्याचा कसा जाईल या विवंचनेत शेतकरी आहे. शासनाकडून दुष्काळी अनुदान, बोंडआळी, गारपीट, अतिवृष्टी अनुदान टप्प्या टप्प्याने शेतकर्‍यांच्या विविध दस्तक बँकांतील खात्यावर जमा होत आहे. जिल्हा बँकेच्या माजलगाव शाखेत मोठ्या  प्रमाणावर शेतकर्‍यांचे खाते आहेत. या खात्यावरही अनुदान जमा झाले आहे. मात्र  हे अनुदान परस्पर उचलल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या शाखेत घडला.

लोनगाव येथील शेतकरी अशोक दिनकर कुलकर्णी यांचे जिल्हा बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्यामधील (002511002100033) चार हजार 227  रुपये  1 नोव्हेंबर 2018 रोजी परस्पर उचलण्यात आले. मोगरा येथील यशोदा शिवाजी पवार यांच्या खात्यात तीन हजार रुपये होते. 6 नोव्हेंबर 2018 रोजी 1600 रुपये उचलण्यात आले. त्यांनी बँकेशी संपर्क केल्यावर ते 1600 रुपये परत देण्यात आले. पाञुड येथील महादेव झगडे यांच्याही खात्यातील 1700रुपये गायब झाली आहे. असाच प्रकार इतरही शेतकर्‍यांसोबत झाला आहे. याप्रकरणी बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.  

रोखपाल घोरपडेचा गलथानपणा 

माजलगाव शाखेचे रोखपाल के.जी.घोडपडे हे कुणाल्याही रकमा कोणालाही देत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकरी अशोक दिनकर कुलकर्णी यांचे पैसे परस्पर उचलले गेले. त्यांचा विल्ड्रॉल क्र. 5636 असा असून विड्रॉल झालेली पावती गायब झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा बँकेतील प्रकाराने शेतकरी परेशान झाले आहेत.

व्यवस्थापक भारती रजेवर 

जिल्हा बँकेच्या माजलगाव येथील शाखा व्यवस्थापक पी.व्ही.भारती आजारी असल्याचे कारण सांगून रजेवर आहेत. सध्या प्रभारी म्हणून शाखा व्यवस्थापक ए.ए.पंडित हे काम पहात आहेत. पंडित यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी हा प्रकार घडल्याचे दिसून आले.

शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे गायब होण्याचा प्रकार माझ्या कार्यकाळात झाला नाही. याविषयी मला अधिक सांगता  येणार नाही. सध्या मी खातेदाराची खात्री झाल्यावरच पैसे देत आहे.: ए.ए.पंडित, प्रभारी शाखा व्यवस्थापक,डीसीसी, माजलगाव 

माजलगावच्या जिल्हा बँकेत  दलालाची मोठी चलती आहे. यामुळे असे प्रकार राजरोसपणे होत आहेत. बँकेकडून शेतकर्‍यांची आर्थिक लूट केली जात आहे.: गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती