Fri, Jun 05, 2020 02:25होमपेज › Marathwada › परभणी : रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

परभणी : रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Published On: May 16 2019 5:46PM | Last Updated: May 16 2019 5:46PM
मानवत (परभणी) : प्रतिनिधी

मानवत तालुक्यातील खडकवाडी शिवारात रानडुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. गुरुवारी (दि. १६) सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली. भानुदास रंगनाथ मसलकर (वय ४५) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते शेताकडे निघाले होते. खडकवाडी शिवारात रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचा लचका तोडला आहे. तर उपचारासाठी त्यांना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 

आर्थिक मदतीची मागणी

मानवत तालुक्यात रानडुकरांनी गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला असून शेतातील पिकांच्या नासडीसह ते शेतकऱ्यांवर हल्ले करू लागले आहेत. जखमी झालेल्या भानुदास मसलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. उपचारासाठी त्यांना शासकीय मदत द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमान मसलकर, खडकवाडीचे सरपंच उद्धव कदम, संतोष गिरी यांचेसह ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे परभणीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे गुरुवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.