Thu, Jun 04, 2020 22:15होमपेज › Marathwada › जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीवर लाखोंचा खर्च

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीवर लाखोंचा खर्च

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:55AMपरभणी : नरहरी चौधरी

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. काही महिन्यांनंतर जुन्या इमारतीतील कार्यालये तिकडे स्थलांतरित केली जाणार आहेत; पण गळती थांबविण्याच्या नावाखाली पूर्वीच्या इमारतीवर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा सपाटा लावला जात आहे. सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कक्षातील रंगरंगोटीसह तेथील छत दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. 

नवीन इमारतीचे बांधकाम कुठपर्यंत आलेले आहे, याचा आढावाही घेतला जात नाही; पण जुन्या इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी सभागृहात मान्यता घेतली जात असल्याचे वास्तव दिसत आहे. अधिकार्‍यांच्या कक्षासह इतर ठिकाणीही कामाकरिता पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे दिसते. काही महिन्यांतच या इमारतीतील सर्व कार्यालये नवीन इमारतीत कार्यान्वित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारीच सांगत आहेत; पण याच विभागाकडून पैशांचा दुरुपयोग केला जात आहे. मागील दोन वर्षांत अनेक कार्यालयांवर रंगरंगोटीसह दुरुस्तीवर लाखोंची उधळपट्टी करत खर्च झालेला आहे. नवीनचे काम सुरू असताना जुन्याच इमारतीवर एवढा अवाढव्य खर्च का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याबरोबरच जि. प. परिसरात ग्रामीण भागातून येणार्‍या सर्वसामान्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून सीईओंच्या कक्षामागे 10 लाख रुपये खर्च करून फिल्टर बसविण्यात आले; पण ते जसे बसविले आहे तसे बंद अवस्थेत असल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे बोलल्या जात आहे.  

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय - 4 लाख 50 हजार, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय - 4 लाख, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय - 3 लाख, अर्थ विभागासमोरील जाळी - 4 लाख, शिक्षण विभाग - 10 लाख, सामान्य प्रशासन कर्मचारी विभाग - 3 लाख 50 हजार, नोव्हेंबर महिन्यात पीआरसी येणार म्हणून इमारत दुरुस्ती व रंगरंगोटीवर - 12 लाख, विरोधी पक्ष गटनेता कक्ष व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षावर - 7 लाख असा खर्च झालेला आहे.