Sun, Jun 07, 2020 14:32होमपेज › Marathwada › रखरखत्या उन्हात प्रत्येकजण थंडाव्याच्या शोधात

रखरखत्या उन्हात प्रत्येकजण थंडाव्याच्या शोधात

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:42PMशिरूर : युवराज सोनवणे

सध्या उन्हाची काहिली दिवसेन्दिवस वाढत असून, तापमान 40 अंशांपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण व्हावे, म्हणून विविध उपाय नागरिक करीत आहेत. उन्हामुळे निर्माण होणार्‍या गर्मीवर मात करण्यासाठी शीतपेय प्राशन केली जात आहेत. यात उसाच्या रसास अधिक पसंती मिळत आहे. कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. शरीरास उन्हाचा दाह असहय होत आहे. त्यामुळे थंड पेय पिऊन आराम मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात रस्त्याच्या बाजूस जागोजागी विविध फळांचे रस,  थंड पेयाची स्टॉल निर्माण झाले आहेत. यात रसवंती गृहांची संख्या जास्त आहे.
रसवंती गृहांची संख्याच जास्त नाही तर रसाचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला हा उसाचा रस कावीळ सारख्या आजारावर रामबाण उपाय ग्रामीण भागातील लोक मानतात. शहरातील रसवंत्यांवर उसाचा थंडगार आणि ताजा रस मिळत आहे. 

या रसाला वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात. यात कधी आईसक्रीम टाकले जाते तर कधी लिंबू पिळून उसाच्या रसाला वेगळी टेस्ट दिली जाते. आले देखील या रसात मिसळले जाते. उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि ग्लुकोजचे बॅलन्स असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. उसाच्या रसमुळे या दोघांचा योग्य समतोल शरीरात राहतो. लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक म्हणून ऊसाचा रस फायदेशिर असतो. बाजारात मिळणार्‍या कोल्ड्रिंक्सपेक्षा उसाचा रस कधीही फायदेशीर आहे.

घुंगरांचा आवाज ऐकला की पावलं आपोआप वळतात...

एप्रिल आणि मे महिना जसा उन्हाळ्याचा असतो तसाच तो परंपरेने लगिन घाईचा ही आहे. त्या मुळे सध्या बाजारात मोठी गर्दी आहे. सकाळी कितीही लवकर खरेदी करण्यासाठी वधू आणि वराकडील मंडळी बाजारात आली तरी त्याची खरेदी संपण्यास दुपार होते. त्या मुळे खरेदी करून दुकानातून बाहेर पडले की रसवंतीचे वाजणारे घुंगरे मन आकर्षित करून घेत आहेत आणि थंडगार रस पिण्यास पावले आपोआपच रसवंती गृहाकडे वळत आहेत.

Tags : Marathwada, Everybody, wants, cold, drinks,  summer, season