Mon, Jun 01, 2020 18:43
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › पाण्याअभावी शेतकऱ्याने ५ एकर पपईच्या बागेवर फिरवला नांगर

पाण्याअभावी शेतकऱ्याने ५ एकर पपईच्या बागेवर फिरवला नांगर

Published On: Jun 15 2019 7:31PM | Last Updated: Jun 15 2019 7:34PM
वडवणी : प्रतिनिधी

दुष्काळाच्या झळांनी वडवणी तालुक्यातील शेतकरी व्याकुळ झाला आहे. विहीरी, बोअर आटल्यामुळे शेतातील फळबागा वाळू लागल्या आहेत. या दुष्काळी स्थितीला कंटाळत लिंमगाव शिवारातील एका शेतकऱ्याने आपल्या पाच एकर पपईच्या बागेवर नांगर फिरवला. दुष्काळाने व्याकुळ झाल्याने खळवट लिमगांव शिवारातील एका शेतकऱ्यावर ही दुर्दैवी वेळ आली. 

वडवणी तालुक्यातील सखाराम शिंदे या शेतकऱ्याने पाच एकर शेतीत पपईची बाग लावली होती. गेल्या वर्षी पपईला चांगला भाव मिळाला होता. या वर्षीही चांगला भाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. शेतात राञ दिवस मेहनत घेऊन त्यांनी पपईची बाग जोपासली होती. वेळेवर खत, फवारण्या व अंतर्गत मशागत केल्यामुळे सखाराम शिंदे यांची बाग जोमात आली होती. मात्र बोअरचे पाणी अचानक कमी झाले. पाणीच वेळेवर मिळत नसल्याने पपईच्या झाडाची व फळाची वाढ खुंटू लागली. पाण्याअभावी हाताला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शिंदे यांनी या फळबागेवर नांगर फिरवत फळबाग उध्वस्त केली. 

दहा लाखाचा फटका

सखाराम शिंदे यांनी पपईच्या बागेत  मोठा खर्च केला होता. किमान दहा लाख रूपयाचे उत्पादन हाती येईल अशी त्यांना आशा होती मात्र दुष्काळाने त्यांचे हे स्वप्न अधुरेच ठेवले. उत्पन्न तर नाहीच बाग मोडण्यासाठी लागणारा खर्च देखील उत्पनातुन आला नाही. अशा या दुष्काळी परिस्थितीमुळे शिंदे यांना सुमारे दहा लाखाचा फटका बसला.

आर्थिक मदत द्यावी

दुष्काळी परिस्थितीमुळे सखाराम शिंदे यांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शिंदे यांना किमान एकरी एक लाखाप्रमाणे पाच लाखाची मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग साबळे यांनी केली आहे.