Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Marathwada › बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे 

बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे 

Published On: Mar 22 2019 5:20PM | Last Updated: Mar 22 2019 5:00PM
बीड  :  प्रतिनिधी  

बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे. मुंडे आणि सोनवणे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२२) शेतकरी संघटनेचे नेते कालीदास आपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

बजरंग सोनवणे यांची उमेदवारी गत आठवड्यात जाहीर करण्यात आली आहे.  तर भाजपाच्या प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर काल (ता.२१) शिक्कामोर्तब झाला. या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची लढत पाहण्यास मिळू शकते, असा तर्क लावला जात आहे.

 डॉ प्रीतम मुंडे या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. मतदाराच्या भेटी -गाठी घेत आहेत. बजरंग सोनवणेही जिल्हाभरात फिरत आहेत. प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराची मदार पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, संगीता ठोबरे यांच्यावर राहणार आहे.  तर राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर असणार आहे. 

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसानंतर प्रचाराचा वेग वाढणार आहे. सोमवारी भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे परळीत गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन बीडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर याच दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपा - राष्ट्रवादी करणार शक्तीप्रदर्शन

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपा व राष्ट्रवादी र्कॉग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षाचे नेते तयारी करीत आहेत. उमेदवारी अर्ज भल्यानंतर, वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा बीड जिल्ह्यात होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ६ एप्रिल रोजी बीडमध्ये होणार आहे. तर शरद पवार हे गेवराईतून राष्ट्रवादी  काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. 

३८ जणांनी खरेदी केले ६८ अर्ज 

बीड लोकसभेसाठी शुक्रवारपर्यंत एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. आतापर्यंत ३८  जणांनी ६८ अर्ज खरेदी केले आहेत. सोमवारी सर्वच पक्षाचे प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.