Fri, Sep 20, 2019 21:50होमपेज › Marathwada › थेट तालुक्यांत जाऊन दिव्यांगांना प्रमाणपत्रांचे वाटप

थेट तालुक्यांत जाऊन दिव्यांगांना प्रमाणपत्रांचे वाटप

Published On: Jan 24 2019 1:29AM | Last Updated: Jan 23 2019 10:04PM
उस्मानाबाद ः प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याने सहा महिन्यांत तब्बल 987 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण आजपर्यंत रेकॉर्डवर नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविता येत नव्हता. हे लक्षात आल्यानेच जिल्हा परिषदेने जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने या शिबिरांची विशेष मोहीम राबवली होती.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अध्यक्ष नेताजी पाटील हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया ही जिल्हा रुग्णालयामार्फत होत असते. योजनांचा लाभ मात्र जिल्हा परिषदेमार्फत मिळतो. जिल्हा परिषदेकडे अशा योजनांचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडून होते. त्याचे वाटप होत नसल्याने माहिती घेतली असता अनेकांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्रच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हा शल्यचिकित्सक गलांडे यांच्याशी चर्चा करुन जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयामार्फत प्रत्येक तालुक्यांत प्रमाणपत्र वाटपांचे शिबिरे घेण्याचे निश्‍चित केले. प्रचलित पध्दतीनुसार प्रत्येक शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील अपंगांना यावे लागते. त्यानंतर तिथे तपासणी होऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. हा प्रवासच अपंगांसाठी त्रासदायक असल्याने ते प्रमाणपत्रासाठी उदासीन असायचे. या विशेष शिबिरांमुळे प्रत्येकाला आपापल्या तालुक्यात प्रमाणपत्र मिळाले. आता हे सर्वजण म्हणजे 987 जण रेकॉर्डवर आल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, अशा विशेष शिबिरांद्वारे प्रमाणपत्र वाटपासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद पहिलीच असल्याचा दावा अध्यक्षांनी केला. तालुकानिहाय प्रमाणपत्र वाटप असे ः लोहारा- 70, उमरगा- 220, कळंब- 125, वाशी- 55, परंडा- 84, तुळजापूर- 227, उस्मानाबाद- 65.