Thu, Jun 04, 2020 23:40होमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंवरील गुन्ह्याला स्थगिती नाही : राजभाऊ फड

धनंजय मुंडेंवरील गुन्ह्याला स्थगिती नाही : राजभाऊ फड

Published On: Jun 14 2019 4:19PM | Last Updated: Jun 14 2019 4:19PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी

बलखंडी बुवा मठ संस्थान जमिन अपहार प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तांत्रिक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या तांत्रिक मुद्द्याला पुढे करून धनंजय मुंडे गुन्हा रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. असा आरोप याचिकाकर्ते राजभाऊ फड यांनी केला आहे. 

याबाबत प्रतिक्रिया देताना फड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना तक्रारकर्त्यांनी अगोदर पोलिस अधीक्षक आणि जिल्हा न्यायालयात दाद मागायला हवी. यानंतर उच्च न्यायालयात दाद मागावी. या तांत्रिक मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या गुन्हा दाखल करण्याचा आदेशाला स्थगिती दिली आहे. या तांत्रिक मुद्द्यावरून स्थगिती देत असताना पोलिसांनी योग्य तो तपास करावा असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वीच पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असल्याने धनंजय मुंडे यांना पोलिस कारवाई पासून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्याना पुढे करून धनंजय मुंडे हे सर्वोच्च न्यायालयाकडुन गुन्हा रद्द झाल्याची चुकीची माहिती देत आहेत. याविरुद्ध तातडीने अवमान याचिका दाखल करणार असल्याचे या प्रकरणातील याचिकाकर्ते राजभाऊ फड यांनी म्हटले आहे.