Sun, May 31, 2020 03:21होमपेज › Marathwada › ऑनलाईन सरकारला ऑफलाईन करण्याची वेळः धनंजय मुंडे

ऑनलाईन सरकारला ऑफलाईन करण्याची वेळः धनंजय मुंडे

Published On: Jan 18 2018 3:44PM | Last Updated: Jan 18 2018 3:44PMगेवराई : पुढारी ऑनलाईन

कापसाची ३५ लाख हेक्टर शेती बोंडअळीमुळे प्रभावित झाली. मात्र सरकारने एका रुपयाचीही मदत केली नाही. प्रत्येक गोष्टीत ऑनलाईन ऑनलाईन करणाऱ्या सरकारला आता ऑफलाईन करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते मराठवाड्यातील गेवराई येथे हल्लाबोल यात्रेमध्ये बोलत होते. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा वनवा आता पेटल्याशिवाय आणि हे जनविरोधी सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ, पिकविमा, कापूस बियाणे नियंत्रण कायदा अशा माध्यमातून मदत जाहीर केली. मात्र, संबंधित यंत्रणांनी हात वर केल्याने कापूस उत्पादकांना एकरी दीड हजारापेक्षा अधिक मदत मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत स्वनिधीतून द्यावी व ती रक्कम संबंधित यंत्रणांकडून स्वतंत्रपणे वसूल करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

सरकारच्या फसव्या घोषणा आणि न झालेल्या विकासाबाबत जनतेस अवगत करून सनदशीर मार्गाने हे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार प्रत्येक बाबतीत सपशेल अपयशी ठरलेले आहे. शेतकरी अडचणीत असून बेरोजगारी वाढली आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारचे कुठल्याच क्षेत्रामध्ये चांगले किंवा भरीव काम दिसत नाही. हल्लाबोल यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून सरकार विरुद्धचा संताप दिसून येतो. वर्षभरात निवडणूका होत आहेत, उरलेल्या काळात तरी नीट काम करा, नाहीतर जनता तुम्हाला घरी बसवल्यासिवाय राहणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल यात्रेवेळी दिला.