Sun, May 31, 2020 02:37होमपेज › Marathwada › उपनगराध्यक्षावरील अविश्‍वास ठराव पारित

उपनगराध्यक्षावरील अविश्‍वास ठराव पारित

Published On: Dec 21 2018 1:25AM | Last Updated: Dec 20 2018 10:49PM
गंगाखेड : प्रतिनिधी

येथील न.प.चे रासपाचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव गुरुवारी (दि.20) बहुमताने पारित झाला. यावेळी नगराध्यक्ष व 17 नगरसेवकांनी मतदान केले. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया होते.

सकाळी 11 वाजता न.प.च्या सभागृहात सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, प्रशासकीय अधिकारी अनिल समिंद्रे उपस्थित होते. सकाळी ठरावावर चर्चा करून मतदान घेण्यात आले. शिवसेनेने नगरसेवकांसाठी तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हिप) काढला होता. ठरावाच्या बाजूने मतदान करणार्‍यांमध्ये काँग्रेसचे 6, राष्ट्रवादीचे 6, भाजपचे 4 व घनदाट मित्र मंडळाचे 1 अशा 17 नगरसेवकांनी मतदान केले. ठराव संमत झाल्यानंतर न.प.प्रशासनाने संबंधीत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणती तारीख निश्चित होते याकडे शहराच्या राजकीयांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना नगरसेवकांची व्हीपवर नाराजी : न.प.त शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. अविश्वास ठरावावर त्यांची स्वाक्षरी नव्हती. पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न घेता इतर पक्षांशी संधान साधून आमच्या थेट घरावर पक्षाधेश चिकटवण्याचा प्रकार केला तो अत्यंत चुकीचा आहे. पक्षश्रेष्ठींच्या वर्तणुकीवर आम्हास शंका असल्याची नाराजी शिवसेनेच्या नगरसेविका सिमा राखे यांनी व्यक्त केली.
सकारात्मक राजकारणाची यशस्वी पेरणी : उप नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव पारित झाला. ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सकारात्मक राजकारणाची यशस्वी पेरणी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली.

उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे लव्हाळे? 

काँग्रेसचे नगरसेवक गोपीनाथ लव्हाळे यांची आगामी उपनगराध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा नसली तरी जिल्हा व स्थानिक काँग्रेसकडून त्यांचे नाव निश्चित असल्याचे वृत्त हाती आले. 

आ.केंद्रे व मुंढे यांची किंगमेकरची भूमिका?

रासपाचे उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यावर अविश्वास जरी आला तरी याची सर्व जुळवाजुळवी करण्यात आ.डॉ.मधुसूदन केंद्रे व भाजपाचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे यांची भूमिका किंगमेकरची ठरल्याचे बोलले जाते.