Sun, Jun 07, 2020 09:25होमपेज › Marathwada › शिंदेंविरुद्धच्या अविश्‍वासावर आज फैसला  

शिंदेंविरुद्धच्या अविश्‍वासावर आज फैसला  

Published On: Dec 20 2018 1:24AM | Last Updated: Dec 20 2018 1:24AM

गंगाखेड : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन नगराध्यक्ष तथा सभेचे पीठासन अधिकारी विजयकुमार तापडिया यांनी केले आहे.

 या सभेत अविश्वास ठरावाचा फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 19) घेतलेल्या पत्रकार परिषदेत रासपाचे 3 विरोधी सोडून बाकीचे 21 नगरसेवक आपल्या सोबतच असल्याचा दावा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी केल्याने रासपला नगरपालिकेच्या राजकारणात एकाकी पाडण्याचे  संकेतच यानिमित्ताने मिळाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीत काँग्रेसचे तापडिया हे विजयी झाले. त्यानंतर झालेल्या राजकीय सत्तास्थापनेच्या समीकरणात काँग्रेसने रासप, शिवसेना व घनदाट मित्र मंडळ यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. अवघ्या दोन वर्षातच काँग्रेस व रासपमध्ये राजकीय काडीमोड झाला असून काँग्रेसने रासपला सोडून भाजप व राष्ट्रवादी हे मित्र नव्याने जुळवत आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व घनदाट मित्र मंडळ असे समीकरण जुळवून सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपनगराध्यक्ष शिंदे यांच्यावर अविश्वास दाखल करण्यात आला. गुरुवारी या अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी नगराध्यक्ष तापडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनुस, काँग्रेसचे युवा नेते सुशांत चौधरी यांची उपस्थिती होती. 

आपली भूमिका विशद करताना तापडिया यांनी पत्रकारांना बेधडक उत्तरे दिली. रासप राज्यात सत्तेत आहे परिणामी या शहराच्या विकासासाठी या पक्षाची सत्तेत मित्र म्हणून मदत होईल या अपेक्षेने आपण सत्तास्थापनेसाठी दोन वर्षापूर्वी सोबत घेतले होते. परंतु कुठलाही एक रुपयाचा निधी देण्यात स्वारस्य दाखवले नाहीच. त्याउलट शिवसेनेने मात्र मोठा विकासनिधी आणून मित्रत्व निभावले. याउलट उपनगराध्यक्षांचा इतर नगरसेवकांना व प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मागील अनेक महिन्यापासून त्रास होता. परिणामी नगरसेवकांनीच उपनगराध्यक्षावर नाराज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळामध्ये शहराच्या विकासासाठीच आपण भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने मित्र सोबत घेतले आहे. यामध्ये कुठलेही मोठे राजकारण नसून केवळ शहराचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. दरम्यान उपनगराध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. रासपच्या स्थानिक पक्षश्रेष्ठींनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करून सहकार्य करावे म्हणून अनेक नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून अथवा संपर्क करून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. परंतु अविश्वास ठरावाच्या बाजूने ठाम राहण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतल्याने पदरी निराशा आली आहे. परिणामी गुरुवारच्या अविश्वास ठराववेळी 03 विरुद्ध 24 नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा नगराध्यक्ष तापडिया यांनी केला आहे.

गुरुवारी राजकीय अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असून पोलिस निरीक्षक सोहम माछरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश थोरात यांनी बुधवारीच मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांची भेट घेऊन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाय योजना केल्या. गुरुवारी नगरपरिषदेला जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे.  अधिकारी, कर्मचारी तसेच अधिकृत नगरसेवक यांच्या व्यतिरिक्त कोणासही नगरपालिकेच्या आवारात प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक माछरे यांनी  दिली आहे.

शिवसेना नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा व्हीप

परभणी : गंगाखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेच्या वेळी शिवसेना नगरसेवकांनी तटस्थ रहावे, असा व्हीप  जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी काढला आहे. शिंदे यांच्याविरुद्ध 16 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर गुरूवारी चर्चा होणार आहे. शिंदे यांच्यावरील हा अविश्वास ठराव मंजूर होतो की नाही? याविषयी नागरिकांत प्रचंड उत्सुकता आहे. गंगाखेड नगर परिषदेत शिवसेनेचे 2 नगरसेवक असून या नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेना नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला आहे.  अविश्वास ठरावावरील चर्चेत शिवसेना नगरसेवकांनी सहभागी न होता तटस्थ रहावे. व्हीपचे उल्लंघन केल्यास संबंधित नगरसेवकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही  दिला आहे.