Sun, Jun 07, 2020 15:13होमपेज › Marathwada › दिराने तोडले भावजयीचे नाक

दिराने तोडले भावजयीचे नाक

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 12 2018 12:14AMपालम : प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यावरील गंगाखेड तालुक्यातील गुंडेगाव येथील महिला आपल्या माहेरी जात असताना दिरासोबत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.यात त्या महिलेचे नाक तुटल्याची घटना दि. 10 मे रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथील चिंगले कुटुंबातांतर्गत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे रंजना चिंगले या मुलांना घेऊन त्यांचे भाऊ रघुनाथ किशन आराटे (रा. पारडी बु., ता. वसमत) याच्यासोबत माहेरी निघाल्या होत्या. ही माहिती रंजनाचा दीर उमाकांत नागोराव चिंगले यांना कळाली होती. यानंतर ते त्यांचा पाठलाग करत पालम येथील मुख्य चौकात चिंगले याने दोघांनाही गाठले. माझ्या भावाच्या मुलांना कोठे घेऊन जात आहेस? असा जाब विचारल्यानंतर वाद झाला.

याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यात दोघांनाही लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. झालेल्या मारहाणीत रंजना व त्यांचे भाऊ हे गंभीर जखमी झाले. यात रंजना यांच्या नाकावर गजाचा जोराचा वार झाल्याने त्यांचे नाक तुटले. रंजना यांना पालम येथील दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले होते. येथे उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रघुनाथ किशन आराटे यांच्या फिर्यादीवरून उमाकांत नागोराव चिंगले (रा. गुंडेवाडी, ता. गंगाखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तरडे हे करत आहेत.