Sun, May 31, 2020 02:13होमपेज › Marathwada › आ. विनायक मेटेंचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार ?

आ. विनायक मेटेंचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार ?

Published On: Apr 10 2019 2:00AM | Last Updated: Apr 09 2019 11:28PM
बीड : शिरीष शिंदे

आ. विनायक मेटे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे  लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका शिवसंग्रामने नुकतीच जाहीर केली आहे. राज्यात भाजप सोबत मात्र जिल्ह्यात नाही अशी असा रोख आ. मेटेंचा आहे. मनातील सल काढण्यासाठी, पालकमंत्र्यांना काटशह देण्यासाठी आ. मेटे आता कोणासोबत जातील याबाबत अद्याप त्यांनी आपली उघड मत व्यक्त केलेले नाही. त्यावर लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. 

मागील चार वर्षांच्या कालावधीत आ. मेटे व पालकमंत्री मुंडे यांच्यात वेगवेगळ्या कारणावरुन संघर्ष होत गेला. विनायक मेटे यांच्या मंत्रिपदाच्या विरोधापासून ते 25-15 च्या विकास कामांमध्ये,  शिवसंग्रामच्या पदाधिकार्‍यांच्या कामामध्ये भाजपने अडवणूक केल्याचा आरोप होत आहे. तसेच शिवसंग्रामच्या पदाधिकार्‍यांसह आ. मेटे यांनाही डावलण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकार्‍यांकडून केला.  तसेच त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली गेल्याचा आरोप शिवसंग्राम पदाधिकार्‍यांकडून होत आला आहे. त्यामुळे आ. मेटे व त्यांचे पदाधिकारी दुखावलेल्या अवस्थेत आहेत. पालकमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी आ. मेटे यांनी ऐन निवडणूक काळत असहकाराचे हत्यार उपसले. शिवसंग्रामला वारंवार डावलेले जात असल्यामुळे आपला राग व्यक्त करण्याची हीच संधी असल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात भाजप सोबत जाणार नसल्याचेही यापूर्वीच त्यांनी जाहीर केले असल्यामुळे आ. मेटे आता रा.काँ. उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत सहकार्य करतील असा अंदाज बांधला जात आहे. आ. विनायक मेटे यांचे मूळ गाव राजेगाव हे केज विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांचा केज मतदार संघावर प्रभाव आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी आ. मेटेे यांनी मोर्चे बांधणी केली असल्यामुळे बीडमध्येही त्यांची ताकद आहे. शिरूर कासार तालुक्यातील पाडळीमध्ये तर परळी, माजलगाव व आष्टी मतदारसंघातही मेटेंचा दबावगट कार्यरत आहे.  त्यांचे हक्काचे मतदानही निर्णायक ठरणार आहे.