Sun, Jun 07, 2020 08:24होमपेज › Marathwada › वसतिगृहासाठी ३ सप्‍टेंबरची डेडलाईन; लातुरात मराठा मोर्चाची बैठक

वसतिगृहासाठी ३ सप्‍टेंबरची डेडलाईन; लातुरात मराठा मोर्चाची बैठक

Published On: Aug 17 2018 10:20PM | Last Updated: Aug 17 2018 10:20PMलातूर : प्रतिनिधी

मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न त्वरीत मार्गी न लावल्यास येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृह मिळेपर्यंत शासकीय कार्यालयासमोर उपोषण करतील, असा निर्णय शुक्रवारी मराठा क्रांती भवनात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती हालखिची असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेकांकडे खोलीभाड्याला व बस पासलाही पैसे नाहीत. त्यांची ही अबाळ दूर करण्यासाठी वसतिगृहाची मागणी मराठा क्रांतीच्या वतीने करण्यात आली होती. ५८ मोर्चे काढूनही ती मार्गी लागली नाही. ठोक मोर्चानंतर सरकारने याबाबत हालचाली सुरू केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षीत होती. पंरतु, ती झाली नाही. त्यामुळे तरुणांत  सरकारप्रती असंतोष पसरल्याचे सांगण्यात आले. सर्वसुविधांनी सुसज्ज असलेले वसतिगृह सरकारने सुरू करावे यासाठी तीन सप्टेंबर ही डेडलाईन देत असून निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील सर्व मराठा विद्यार्थी व विद्यार्थिनी शासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करतील, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात अजूनही सरकार गंभीर नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत मराठा युवकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्याचे करीअर संपवण्याचा कट सरकारने आखल्याचा आरोप समाजबांधवांनी केला. आंदोलना दरम्यान नोंदवलेले हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. यासाठी सोमवारी (२० ऑगस्ट) जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठऱले.  बैठकीस जिल्हाभरातील समाजबांधव व मराठा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

अटलजींना श्रध्दांजली

देशाचे माजी पंतप्रधान लोकनेते अटलबिहारी वाजपेयी यांना मराठा क्रांतीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. निस्वार्थी भावनेने राष्ट्रसेवा केलेल्या अटलजींचे जीवन हा अखंड स्फुर्तीचा झरा असल्याची  भावना यावेळी समाजबांधवानी व्यक्त केली.

संविधान दहनाचा निषेध

दिल्ली येथे संविधान दहन केलेल्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. यात गुंतलेल्या देशद्रोह्यांना कठोर शासन कऱण्याची मागणी यावेळी करण्यात आली.