Thu, Oct 17, 2019 14:27होमपेज › Marathwada › देशात सध्या अघोषित आणीबाणी  : कोकाटे

देशात सध्या अघोषित आणीबाणी  : कोकाटे

Published On: Nov 19 2018 1:02AM | Last Updated: Nov 19 2018 12:04AMहिंगोली : प्रतिनिधी

सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असून हिटलरशाही परिस्थिती राबवली जात आहे. असा आरोप संभाजी बिग्रेडचे प्रवक्ता तथा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी हिंगोली येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी (दि.18) केला आहे.

यावेळी संभाजी बिग्रेडचे प्रदेश संघटक सुभाष बोरकर, डॉ.नामदेव कर्‍हाळे, गणेश शिंदे, गजानन शिंदे, संभाजी माने, गजानन पांढरे, संजय टाकळगव्हाणकर, रवी मोरे आदींची उपस्थिती होती. कोकाटे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच देशात आराजकतेची परिस्थीती निर्माण झाली आहे.  सत्ताधार्‍यांनी न्याय व्यवस्थेवर अतिक्रमण केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनाच पत्रपरिषद घेऊन जनतेसमोर हा विषय मांडावा लागला असा आरोप त्यांनी केला. लोकशाही ही सत्ताधार्‍यांच्या हिटलरशाहीला बळी पडली असून संविधानीक मुल्य पायदळी तुडवली जात आहेत. न्याय व्यवस्था ही स्वाय्यत सत्ता असतांना इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर न्याय व्यवस्था धोक्यात असल्याची कबुली द्यावी लागली आहे. ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे. यावेळी त्यांनी नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, सिंचन प्रश्‍न, उत्पादन मुल्यावर आधारीत भाव आदीं प्रश्‍नावर भाष्य केले. सरकारने या विषयाकडे गांर्भीयाने बघुन  तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.